Home Breaking News कोरोना काळातील उद्याचं सूर्यग्रहण खरंच काळजी वाढवणारं आहे…का??? ✍️ ( विजय...

कोरोना काळातील उद्याचं सूर्यग्रहण खरंच काळजी वाढवणारं आहे…का??? ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

380
0

🛑 कोरोना काळातील उद्याचं सूर्यग्रहण खरंच काळजी वाढवणारं आहे…का??? 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

⭕ दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक.

रविवारी, २१ जूनला होणारे ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ संपूर्ण भारतातून दिसणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांतील काही प्रदेशांतून दिसणार असून, उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास अवस्थेत दिसणार आहे. सध्या कोरोनाशी लढाई सुरू असल्याने या सूर्यग्रहणाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहिले जात आहे. या सूर्यग्रहणामुळे असे घडेल, तसे घडेल असे संदेश व्हायरल होत असल्याने जनसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना आणि वादळामुळे लोक आधीच ग्रासलेले असताना अशी अवैज्ञानिक भाकिते चिंतेत भर टाकत आहेत. त्यामुळे ग्रहणविषयक गैरसमजुतींचे ग्रहण सुटणे आवश्यक झाले आहे.
चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाला झाकून टाकते, त्यावेळी सूर्यग्रहण दिसते. ज्यावेळी चंद्रबिंबामुळे सूर्यबिंबाचा काही भाग झाकला जातो, त्यावेळी ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसते. ज्यावेळी संपूर्ण सूर्यबिंब झाकले जाते त्यावेळी खग्रास सूर्यग्रहण दिसते. खग्रास सूर्यग्रहणावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल, तर चंद्रबिंब आकाराने लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. त्यावेळी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसते त्याला आपण ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ असे म्हणतो. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे नैसर्गिक आविष्कार आहेत. प्राचीनकाळी ज्यावेळी विज्ञान प्रगत नव्हते, त्यावेळी जनसामान्यांना ग्रहणांची भीती वाटणे साहजिकच होते. त्यामुळे काही प्राचीन ग्रंथांमध्ये ग्रहणकाळात पाळावयाचे नियम सांगितले गेले; परंतु विज्ञानात प्रगती झाल्यामुळे ग्रहण हा चमत्कार नसून, तो एक नैसर्गिक खगोलीय आविष्कार आहे हे सर्वांना समजून आले आहे.
सूर्यग्रहणात काही धार्मिक नियम सांगितलेले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यामध्येही काही तथ्य नाही. अर्थात काही लोक श्रद्धा म्हणून नियम पाळत असतील तर बोलणेच खुंटले! कारण श्रद्धा म्हटले की, पुढे कार्यकारणभाव शोधणे येतच नाही. ग्रहणांचा घटनांवर किंवा मानवी जीवनावर परिणाम होत नाही असे विज्ञान सांगते. हे वैज्ञानिक युग आहे. पुढच्या पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिलेली उत्तरेच पटतात. आजचा भारत पुढची पिढी घडविणार आहे. नव्या पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे महत्त्वाचे आहे. पालक, शिक्षक आणि जाणकारांनी ग्रहणासारख्या खगोलीय घटना व त्यामागचे विज्ञान नव्या पिढीला समजावून सांगितले पाहिजे. त्यासाठी पालक, शिक्षक व जाणकारांनी स्वत: वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणे आवश्यक आहे. रविवारी होणारे ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ ठरल्यावेळी सुटेल; परंतु ग्रहणविषयक अंधश्रद्धांचे ग्रहण कधी सुटणार…? ⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here