🛑 दोन-अडीच महिन्याचे एकत्र बिल आल्यास! वीजग्राहकांनो घाबरू नका 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे :⭕ पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह मुळशी, मावळ, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यांमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत बंद करण्यात आलेले मीटर रिडींग व वीजबिल वितरणाचे काम स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळालेल्या भागात आणि कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून सुरु करण्यात आले आहे.
दरम्यान, 23 मार्चनंतर आता वीजग्राहकांकडील मीटर रिडींग घेतल्यानंतर प्रत्यक्ष वीजवापराच्या युनिटप्रमाणे दोन ते अडीच महिन्यांचे एकच अचूक वीजबिल दिले जात आहे. यामध्ये ग्राहकांनी एप्रिल, मे महिन्यात भरलेली रक्कम व सरासरी युनिट समायोजित केले जात आहे. कोरोना विषाणूमुळे लॉकडाउनच्या कालावधीत महावितरणकडून मीटर रिडींग घेणे व छापील वीजबिल वितरीत करणे तात्पुरते बंद करण्यात आले होते.
एकत्रित बिल आल्यास घाबरू नका- लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग तात्पुरते बंद असल्याने ग्राहकांना सरासरी युनिटचे वीजबिल पाठविण्यात आले होते. तसेच वेबपोर्टल व मोबाईल अॅपद्वारे स्वतःहून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. मात्र एप्रिल, मे, जून महिन्यांत स्वतःहून रिडींग न पाठविणाऱ्या वीजग्राहकांना आता मीटर रिडींग घेतल्यानंतर अचूक व प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिल पाठविण्यात येत आहे.
हे वीजबिल लॉकडाऊन कालावधीतील दोन-अडीच महिन्यांचे असले तरी संगणकीय प्रणालीद्वारे बिलाची मासिक वापरानुसार विभागणी करून युनिट व स्लॅबप्रमाणे वीजदर लावून (स्लॅब बेनिफिटसह) देण्यात येत आहे. उदा. दोन महिन्यांचे वीजबिल 330 युनिट असल्यास 330 युनिटचा स्लॅब दर न लावता मासिक प्रत्येकी 165 युनिटप्रमाणे स्लॅब दर लावण्यात येत आहे. तसेच एप्रिल व मे महिन्यांतील सरासरी युनिटचे व बिलाची रक्कम भरली असल्यास फिक्स चार्जेस, विद्युत शुल्क वगळून उर्वरित रकमेचे समायोजन करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी संबंधीत वीजबिलामध्ये नमूद करण्यात येत आहे. महावितरणच्या अधिकृत वीजबिल केंद्र किंवा घरबसल्या अॉनलाईनद्वारे चालू व थकीत वीजबिलांच्या रकमेचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.⭕