• Home
  • वादळी पावसाने प. महाराष्ट्राला झोडपले; पुण्यात घरांमध्ये शिरले पाणी

वादळी पावसाने प. महाराष्ट्राला झोडपले; पुण्यात घरांमध्ये शिरले पाणी

🛑 वादळी पावसाने प. महाराष्ट्राला झोडपले; पुण्यात घरांमध्ये शिरले पाणी 🛑
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे : ⭕ अरबी समुद्रात तयार होत असलेल्या निसर्ग या चक्रीवादळाचे पडसाद मंगळवारी पश्चिम महाराष्ट्रासह नाशिक भागामध्येही उमटले. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाने झोडपले. नाशिक जिल्ह्यासह जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्येही पावसाने हजेरी लावली. पुण्यात मंगळवारी संध्याकाळी दोन तासांत ३८.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुणे शहरात रात्री काही भागांत रस्त्यांवर पाणी साचले होते तर वडगाव शेरीसह काही भागांत घरांमध्येही पाणी शिरले होते.

राज्यात गेल्या आठवड्यापर्यंततापलेले वातावरण आता निवळले असून मान्सूनच्या आगमनाचे नागरिकांना वेध लागले आहेत. वातावरणातील नव्या घडामोडीमुळे राज्याच्या विविध भागातमंगळवारीही पावसाने हजेरी लावली. पुणे शहराच्या सर्वच भागात दिवसभर ढग दाटून आलेहोते, दुपारी मेघगर्जना झाली पण पाऊस पडला नाही. संध्याकाळी सहानंतर काळोख पसरला आणि सातनंतर शहराच्या सर्वच भागात पावसाची मोठी सर आली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यामध्ये सोमवारी जिल्ह्यातील दिंडोरी, बागलाण, कळवण तालुक्यात पाऊस झाला. तर मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामध्ये दिंडोरीत शाळेचे नुकसान झाले. तर, सटाण्यात वीज कोसळून कांदा चाळ खाक झाली. मालेगाव, चांदवड, निफाडमध्ये रिमझिम पाऊस झाला. मान्सूनपूर्व वादळी पावसाने मध्यरात्री जळगाव जिल्ह्यात हजेरी दिली. या पावसात काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर तारा पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. धुळे शहरात दिवसभर ढगाळ वातावरण कायम दिसून आले. सकाळी थोडीफार पावसाची रिपरिपही सुरू होती.

जुन्नर, आंबेगाव तालुक्यांना धोका

कोकण किनारपट्टीवर घोंगावत असून या वादळाचा फटका पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांना बसण्याची शक्यता असल्याने या तालुक्यांमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. महावितरणने डोंगराळ भागातील गावांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी दुरूस्तीसाठी पथकांची नेमणूक करावी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाने संभाव्य धोकादायक ठिकाणी पथके नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जुन्नर-आंबेगाव उप विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या सूचना केल्या आहेत. राज्याच्या कोकण किनारपट्टीवर तीन व चार जून रोजी ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव हे तालुके दक्षता क्षेत्रात येत आहेत. या पार्श्वभूमीवर डुडी यांनी जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये या सूचना केल्या आहेत. डुडी म्हणाले, ‘जुन्नर आणि आंबेगावमधील आपत्ती व्यवस्थापनांतर्गत उपाययोजना करून संबंधित अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे. करोनाच्या पार्श्वभूमीवर चक्रीवादळाचा तडाखा आणि अतिवृष्टीपासून संभाव्य बाधित कुटुंबांचे स्थलांतर करताना खबरदारी घेण्यात यावी. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये. भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी विशेष खबरदारी घ्यावी.’⭕

anews Banner

Leave A Comment