• Home
  • मुंबईतील करोनाचा पहिला हॉटस्पॉट वरळी कोळीवाडा करोनामुक्तीकडे

मुंबईतील करोनाचा पहिला हॉटस्पॉट वरळी कोळीवाडा करोनामुक्तीकडे

🛑 मुंबईतील करोनाचा पहिला हॉटस्पॉट वरळी कोळीवाडा करोनामुक्तीकडे 🛑
मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई ⭕वरळी कोळीवाड्यातील ७० टक्के भागात मागील २० दिवसांहून अधिक काळ एकही नवीन करोना रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे कोळीवाड्याच्या दहा ते बारा भागांतील म्हणजे सुमारे ६० ते ७० टक्के प्रतिबंधित क्षेत्र खुले करण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांनंतर या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र पुढील अनिश्चित काळासाठी सामाजिक वावर, मास्क, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे नियम पाळावे लागणार आहेत.

जी-दक्षिण विभागातील वरळी कोळीवाडा, आदर्श नगर, जिजामाता नगर परिसर हा मुंबईतील करोनाबाधितांचा पहिला हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता. करोना साथीच्या पहिल्या टप्प्यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण या भागात सापडल्याने हा परिसर खूप चर्चेत होता. या विभागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेल्याने पालिकेने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला होता. पोलिस आणि पालिकेने नागरिकांसाठी अत्यंत कठोर नियमावली केली होती.

विभागातील रुग्णांचे प्रमाण खाली आणण्यासाठी पोलिस आणि पालिका प्रशासनाने उपाययोजनांचा नवीन आराखडा राबवला. नागरिकांनीही त्यास सहकार्य केल्याने रुग्णवाढ रोखता आली, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. कोळीवाड्यातील १० ते १२ भाग तसेच जनता कॉलनीतील सहा ते सात भाग प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आले आहेत. उर्वरित ३० टक्के भागात देखील नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याने हा भाग निरीक्षणाखाली ठेवण्यात आला आहे.

एक हजार रुग्ण घरी परतले

जी-दक्षिण विभागातील रुग्णसंख्या रविवारी २,०६६ पर्यंत पोहोचली असून आत्तापर्यंत एक हजार जण बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजे प्रत्यक्षात एक हजार ६६ रुग्ण आता या विभागात शिल्लक असून बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५० टक्के आहे. या विभागात ६०हून अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

मासेमारीसाठी लवकरच परवानगी

वरळी कोळीवाड्यात कोळी समाजाची संख्या सर्वाधिक असून मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. कोळीवाड्यात सुमारे २००हून अधिक मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात शिथिलता आणलेल्या भागात मर्यादित स्वरूपात मासेमारी करण्यास लवकरच परवानगी दिली जाणार आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.⭕

anews Banner

Leave A Comment