Home Breaking News आजची समूह व्यक्ति- जयश्री पाटील मॅडम ( प्रभारी अधिकारी- तळबीड पोलीस स्टेशन...

आजची समूह व्यक्ति- जयश्री पाटील मॅडम ( प्रभारी अधिकारी- तळबीड पोलीस स्टेशन )*

469
0

*आजची समूह व्यक्ति- जयश्री पाटील मॅडम ( प्रभारी अधिकारी- तळबीड पोलीस स्टेशन )*
सातारा,(संकेत वाणी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)-
पती डॉक्टरी पेशामुळे कोल्हापुरात रुग्णसेवेत व्यस्त….. एकीकडे दोन चिमुकल्यांसह वयस्कर सासुबाईंची जबाबदारी तर दुसरीकडे तळबीड सारख्या औद्योगिक पोलीस स्टेशनचा प्रभार…. लॉक डाऊन नंतर महिनाभर कोरोना मुक्त असणाऱ्या तळबीड पोलीस स्टेशनच्या हद्दीत *अचानक वनवासमाचीत एक रुग्ण आढळला आणि मारुतीच्या शेपटीप्रमाणे एका छोट्याशा गावातील आकडा तब्बल 39 रुग्णांपर्यंत पोहचला* … संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या छोट्याशा गावावर केंद्रित झाले….तरीही तिळमात्र खचून न जाता मोठ्या धैर्याने या अस्मानी संकटाचा सामना करत वनवासमाची तील जवळपास 80 टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतेपर्यंत *डोळ्यात तेल घालून दिवस-रात्र पहारा करणारी रणरागिणी* म्हणजे आपल्या आजच्या समूह सदस्या व तळबीड पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी *जयश्री पाटील मॅडम होत!*
*अचानकपणे ओढवणारी अस्मानी संकटे आणि त्याचा यशस्वी मुकाबला करण्याची दैवी ताकत हा जणू कोल्हापूरच्या मातीचा गुणधर्मच झाला आहे* . जयश्री पाटील मॅडम यादेखील कोल्हापूरच्याच! करवीर निवासिनी अंबाबाईच्या परिसरात बालपणापासून खेळल्या- बागडलेल्या पाटील मॅडम या शालेय कारकिर्दीत *अभ्यास आणि क्रीडा* या दोन्ही क्षेत्रात लक्ष्यवेधी विद्यार्थिनी ठरल्या होत्या. पदवीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आणि कोल्हापुरातील रणरागिनींच्या यादीत आणखी एका फौजदार महिलेची नोंद झाली. नाशिक येथील खडतर ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण करून पहिलेच पोस्टिंग त्यांना कोकणात सावंतवाडी या ठिकाणी भेटले. गोवा राज्याच्या हद्दीनजीक लाकडी खेळणी बनवणाऱ्या कारखान्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सावंतवाडीत पाटील मॅडमनी अनेक छोट्या-मोठ्या कारवाईच्या माध्यमातून त्यांच्या अंगीभूत गुणांची चूनुक दाखवली. सावंतवाडी नंतर त्यांनी काही काळ रत्नागिरी जिल्ह्यात सेवा बजावली. कोकणातील यशस्वी सेवेनंतर त्या प्रमोशनवर सांगली जिल्ह्यातील आष्टा या ठिकाणी सहा पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाल्या. एकेकाळी वाळवा तालुका हा महाराष्ट्रातील *बिहार* म्हणून परिचित होता. आष्टा पोलीस हद्दीतील काही *उगवत्या ताऱ्यांनाही गुन्हेगारीची वाट चोखाळत होती. वेळीच मॅडमनी त्यांना लगाम घातला* . आष्टा येथील धमाकेदार कामगिरीनंतर त्यांनी
कुंडल याठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून चार्ज स्वीकारला. द्राक्ष बागायतदारांचे गाव म्हणून परिचित असणाऱ्या कुंडल परिसरात अवाजवी वाळू उपसा व इतर अनेक कारणांमुळे गुन्हेगारी फोफावली होती. त्यामुळे क्रांतीअग्रणींचे गाव म्हणून परिचित असणाऱ्या *कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही* असे म्हटले गेले होते. यावेळी मॅडमनी ॲक्शन घेतली आणि तथाकथित दादा लोकांवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला. मॅडम दुष्कृत्ये करणाऱ्या आरोपींना अटक करायच्या आणि न्यायालयात हजर करायच्या. उर्वरित जबाबदारी त्यांच्या सहकारी, पलूस न्यायालयातील सरकारी वकील व आपल्या समूह सदस्य *शीला नाईक मॅडम* यथोचितपणे पार पाडायच्या. दोघींची छान गट्टी जमली होती. खून, खुनाचा प्रयत्न व महिलांबाबतच्या गुन्ह्यात त्या अतिशय सजग असतात. आष्टा व कुंडल याठिकाणी कार्यरत असताना सांगली जिल्हा न्यायालयाने त्यांनी तपास केलेल्या अनेक गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा दिलेली आहे.
सध्या त्या सेवेत असलेल्या तळबीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा तासवडे टोल नाका हा नेहमीच येनकेन कारणाने प्रसिद्ध असतो. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाका असल्यामुळे राज्यभरातील अनेक गुन्हेगारांचा तपास करण्याकरता परजिल्ह्यातील पोलीसही नेहमी या पोलिस स्टेशनच्या सहकार्याने अनेक गुन्हेगारांचा पर्दाफाश करत असतात. याबाबतही त्यांनी नेहमीच सहकार्याची भावना जोपासली आहे. तासवडे औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे प्रश्न सोडवताना त्यांनी बेताल उद्योजकांना धडा शिकवताना अजिबात मागेपुढे पाहिलेले नाही. गतवर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा येथे आलेल्या प्रलयकारी महापुरामुळे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आले होते. राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यामुळे हजारो ट्रक रस्त्यावरच थांबले होते. एक सुरक्षित ठिकाण म्हणून तासवडे टोल नाक्याच्या परिसरात थांबवलेल्या ट्रक चालकांची त्यांनी यथोचित काळजी घेतली, त्यांनी केलेल्या सेवेची दखल घेऊन कोल्हापूर *विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुहास वारके साहेब यांनी त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले आहे.*
कोरोना लढ्यात त्या अहोरात्र सक्रिय आहेत. वनवासमाची गावामुळे त्यांना गेल्या महिन्यापासून थोडीशीही उसंत मिळालेली नाही. तहानभूक हरपून त्या कार्यरत आहेत. कुटुंबाकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. *दोन छोट्या पिल्लांना आणि वृद्ध सासूबाईंना अक्षरशः कुलूपबंद करून त्यांना सेवा बजावावी लागत आहे* मात्र चेहऱ्यावरील तेज व आत्मविश्वास तसूभरही ढळलेला दिसत नाही.
वनवासमाची कोरोना मुक्त झाली असून जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण असतानाही *निखराचा लढा* देऊन *जयश्री* संपादित करत असणाऱ्या *पाटील मॅडम* यांना वाटचालीस मनःपूर्वक सदिच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here