
पोलीस अधीक्षकाच्या स्टींग ऑपरेशनमुळे चेकपोस्टवरील दोषी आढळलेले 3 पोलीस निलंबित
बीड : ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
बीड : पुण्या-मुंबईहून आणि इतर जिल्ह्यातून विनापास तसंच लोकं चुकीच्या पद्धतीने बीड जिल्हा हद्दीत येत आहेत, अशा तक्रारी ऐकायला मिळतायेत. विशेष म्हणजे चेक पोस्टवर सुद्धा पास नसलेल्या गाड्यांना सोडलं जातं का? हेच पाहण्यासाठी बीड पोलिसांनी चक्क चेक पोस्टवर स्टिंग ऑपरेशन केलं. यावेळी दोषी आढळलेल्या पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे तर ज्यांनी चांगलं कर्तव्य बजावलं त्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. एस.बी.उगले, एम.के. बहीरवाळ, डी.बी.गुरसाळे अशी निलंबित पोलिस कर्मचार्यांची नावे असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
या स्टिंग ऑपरेशनमध्ये गेवराई ठाणे हद्दीतील शहागड-खामगांव चेकपोस्टवर डमी प्रवाशांनी चेकपोस्टवर जिल्ह्यात येण्यासाठी विनंती केल्यावर तेथील पोलीस कर्मचार्याने डमी प्रवाशाकडे पैसे मागितले. याचा अर्थ याचे पोस्टवरून काही पोलीस पैसे दिल्यावर गाडी जाऊ देत होते. या प्रकरणात विनापास प्रवाशी प्रवेश करण्यास मदत केली म्हणून तीन पोलीस कर्मचार्यांना बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्वरीत शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी जिल्ह्यात काल दिवसभर व रात्रीही या चेकपोस्टवर खाजगी डमी प्रवासी वाहनासह चेकपोस्टवर आणून हे स्टिंग ऑपरेशन केले. या स्टिंग ऑपरेशनमुळे बीड जिल्ह्याच्या चेक पोस्ट वरील सुरक्षा आणखी कडक होणार आहे.स्टींग ऑपरेशनदरम्यान मातोरी येथील चेकपोस्टच्या ठिकाणी डमी प्रवासी यांनी अहमदनगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी मातोरी चेकपोस्टवरील कर्मचार्यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता त्या इसमास जिल्ह्यात प्रवेश दिला नाही. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल डी.एम.राऊत, डी.एम.डोंगरे, टी.यु. पवळ यांना पोलीस अधीक्षकांकडून प्रोत्साहनपर प्रत्येकी 5000 रुपयांचे बक्षीस दिले आहे.