आशाताई बच्छाव
कोल्हापूर , दिपक कदम प्रतिनिधी –युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या, महाराणी ताराबाईंच्या त्याग, शौर्य आणि कर्तृत्वाचा वारसा लाभलेल्या तसंच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी घडवलेल्या ह्या ऐतिहासिक, अध्यात्मिक, सामाजिक सुधारणांच्या कोल्हापूर नगरीमध्ये आज दैनिक पुढारीचे प्रमुख, पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त ‘सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा’ आणि ‘सिंहायन’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.
या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्रीश्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत सहभागी झालो. यावेळी आदरणीय मा.श्री. शरद पवार साहेब देखील उपस्थित होते.
महाराष्ट्रातल्या पत्रकारितेच्या इतिहासामध्ये पुढारी दैनिकाची स्थापना करणारे पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. सत्यशोधक चळवळीचे संस्कार, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार अवलंबून त्यांनी या दैनिकाची स्थापना केली आणि आयुष्यभर समाजप्रबोधन, सामाजिक जागृतीचं कार्य त्यांनी अखंड चालू ठेवलं. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारितेच्या कठीण परिस्थितीत, मर्यादित साधनसामग्रीमध्ये डॉ. ग. गो. जाधव यांनी आपल्या अविचल निष्ठेनं, राष्ट्रप्रेमानं, असामान्य चिकाटीच्या बळावर पत्रकारितेतील आव्हानांना यशस्वीपणे हाताळलं. आपल्या कार्यानं त्यांनी महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या विश्वात आदर्श निर्माण केला. त्याचप्रमाणे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिवर्तनाच्या लाटेत ‘पुढारी’ हा जनतेचा प्रखर आवाज त्याकाळी ठरला.
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रबोधनपर विचारांचा वारसा पुढारीचे सध्याचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी समर्थपणे पुढे नेलेला आहे. पिता-पुत्रांना पद्मश्री प्राप्त होणं ही पत्रकारिता क्षेत्रातील एक प्रेरणादायी घटना आहे. डॉ. प्रतापसिंह यांनी पुढारीच्या माध्यमातून तुमच्या माझ्या ग्रामीण भागातल्या जनतेचा आवाज बुलंद केला आणि नव्या युगामध्ये त्या परंपरेला आधुनिकतेची जोड दिली. त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र श्री. योगेश जाधव यांनी पुढारी समूहाला ‘पुढारी वृत्तवाहिनी’ आणि ‘टोमॅटो एफएम’ माध्यमातून डिजिटल विश्वाशी जोडलं.
डॉ. प्रतापसिंह यांनी पुढारीच्या माध्यमातून गेली अनेक दशकं जनमानसाला दिशा देण्याचं काम तसंच पत्रकारितेद्वारे जनतेच्या हिताला कायमच प्राधान्य दिलं. सत्यनिष्ठा, निर्भीडपणा आणि लोकशाहीवर ठाम श्रद्धा या तीन स्तंभांवर पुढारी वृत्तपत्र उभं राहिलेलं आहे. वास्तुनिष्ठ वार्तांकन आणि साक्षेपी अग्रलेख यावर त्यांचा नेहमीच भर राहिला. पत्रकारितेमध्ये त्यांनी कधीही आपली राजकीय विचारसरणी आणू दिली नाही. व्यवसायापलीकडे जाऊन त्यांनी कायमच सामाजिक हित जपण्याचं काम केलं. त्यामुळेच पुढारी हे केवळ वृत्तपत्र नव्हे, तर ती आज एक संस्था बनलेली आहे.






