आशाताई बच्छाव
कारचे पंक्चर काढत असताना भरधाव वाहनाची धडक; कोळगावच्या युवकासह दोघांचा मृत्यू
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर जयपूर शिवारात कारचे पंक्चर काढत असताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत कोळगाव (ता.निफाड) येथील युवकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात योगेश दत्तात्रय घोटेकर (३८, रा. कोळगाव, ता. निफाड) व देविदास नाना मते (६०, रा. जयपूर, ता. छत्रपती संभाजीनगर) यांचा मृत्यू झाला. तर बाळू विश्वनाथ घोटेकर (६०, रा. कोळगाव) गंभीर जखमी झाले आहेत.
घोटेकर हे रेशीम कोष विक्रीसाठी कारने जालन्याकडे जात होते. दरम्यान, मंगळवारी दहा वाजता कारचे पंक्चर झाल्याने ती महामार्गाच्या कडेला उभी करून दुरुस्ती सुरू होती. त्यावेळी शेतात काम करणारे देविदास मते मदतीसाठी आले. त्याचवेळी भरधाव वाहनाने तिघांना जोरदार धडक दिली. करमाड पोलिसांनी तातडीने जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी योगेश घोटेकर व देविदास मते यांना मृत घोषित केले. या अपघाताचा तपास पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, सुहास डबिर व विजयसिंग जारवाल करीत आहेत.
◆मदतीला धावलेल्याचाही बळी
देविदास मते हे अल्पभूधारक शेतकरी होते. शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. कार अडचणीत पाहून मदतीला धाव घेतली; पण भरधाव वाहनाच्या धडकेत त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित तीन मुली व मुलगा असा परिवार आहे.