आशाताई बच्छाव
“चंद्रपूर आणि गडचिरोली नवीन इंडस्ट्रियल मॅग्नेट”
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मूल, चंद्रपूर येथे जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण संपन्न झाले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज विकास निधीतून अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत असून, त्यामध्ये टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल, कौशल्याधारित रोजगार, आरोग्य, पायाभूत सुविधा विकास, शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून विकसित होत आहेत आणि या औद्योगिक विकासामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ज्या ठिकाणी खनिज उत्खनन होते त्या ठिकाणच्या नागरिकांना खनिज निधीचा जास्तीत-जास्त फायदा मिळालाच पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्याने रोजगार निर्मिती, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास आणि पर्यावरणपूरक नाविन्यपूर्ण प्रकल्पांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून तयार होत असून, सुमारे 1.5 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. पर्यावरण संतुलन राखत औद्योगिकीकरण घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले की, औद्योगिकरणासोबतच चंद्रपूरने पर्यावरण संतुलन राखले, असा संदेश गेला पाहिजे. तसेच 100% स्थानिकांना रोजगार मिळेल, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी वृक्षलागवडीचा मुद्दा अधोरेखित करत सांगितले की, महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे ज्याने ‘ग्रीन कव्हर’ वाढवले आहे. मात्र आता आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचे वनक्षेत्र 33 %च्या वर नेण्याकरिता विशेष लक्ष द्यायचे आहे.
यावेळी मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे व इतर मान्यवर उपस्थित होते.