आशाताई बच्छाव
आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त मुरमाडी येथे महिलांची उत्स्फूर्त जनजागृती
“माहितीचा अधिकार – सशक्त नागरिक, पारदर्शक शासन” या संदेशाने महिलांचा सहभाग
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:- आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून मुरमाडी गावाने एका प्रेरणादायी उपक्रमाचे साक्षीदार होण्याचा मान मिळवला. ग्रामीण महिलांसाठी विशेषतः आयोजित या जनजागृती कार्यक्रमात “अज्ञानाच्या अंधारातून सजगतेच्या प्रकाशाकडे – माहितीचा हक्क प्रत्येकाच्या दारी” हा प्रभावी संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन मा. मनोज सुरेश उराडे, जिल्हा अध्यक्ष – माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती यांनी केले. त्यांनी महिलांसमोर माहितीचा अधिकार कायदा, 2005 याची उपयुक्तता सांगताना, शासन यंत्रणेत पारदर्शकता व जबाबदारी निर्माण करण्यासाठी हा कायदा किती प्रभावी ठरू शकतो यावर प्रकाश टाकला. त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे दाखवून दिले की, योग्य पद्धतीने माहिती अधिकाराचा वापर केल्यास प्रत्येक सामान्य नागरिक आपल्या हक्कांसाठी प्रशासनास जबाबदार धरू शकतो.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जेष्ठ नागरिक लीलाबाई बोरकर, सामाजिक कार्यकर्त्या सविता बांबोळे, ग्रामपंचायत सदस्य हिरकन्या बोरकर व सौ. सुनीता राऊत, तसेच सौ. अनुपमा रॉय, तालुका अध्यक्षा – माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती हे होते. मान्यवरांनी महिलांना आवाहन केले की, *“माहिती हा तुमचा अधिकार आहे, त्याचा वापर करा आणि अन्याय व भ्रष्टाचाराविरोधात ठामपणे उभे रहा.”
मुरमाडी, आबेशिवणी, टोला आदी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला जीवंतपणा आणला. महिलांच्या दैनंदिन समस्या, शासकीय योजनांचा अपुरा लाभ, व प्रलंबित प्रश्न याविषयी संवाद साधून कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण बनवण्यात आला. महिलांनी थेट प्रश्न विचारले आणि त्यांना समाधानकारक उत्तरेही मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता बांबोळे यांनी सहजतेने केले, तर शेवटी आभारप्रदर्शन सौ. अनुपमा रॉय यांनी मान्यवरांचे आणि उपस्थित महिलांचे आभार मानून केले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या मनात माहिती अधिकाराबद्दलची जाणीव आणखी दृढ झाली आहे. या कार्यक्रमातून महिलांनी ठाम संदेश दिला की “माहितीचा अधिकार हा केवळ कागदावरचा कायदा नाही, तर समाज परिवर्तनाचे आणि महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रभावी शस्त्र आहे.”