आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक : दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच या, अन्यथा तिथेच थांबा – सपकाळ यांचा फडणवीसांना इशारा
मुंबई/बुलढाणा, दि. २६ सप्टेंबर २०२५
महाराष्ट्रातील शेतकरी सततच्या पावसाने अस्मानी-सुलतानी संकटात सापडला आहे. खरीप हंगाम अतिवृष्टीने पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील पुरग्रस्त भागांची पाहणी करून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
सपकाळ म्हणाले, “मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत, पण शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सुरजागड खाणमालकांच्या हितासाठी चर्चा करीत आहेत. हे संतापजनक आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तिथेच थांबावे.”
बुलढाण्यातील कामखेड, गुळभेली, राहेरा दाभोळ तांडा, नळकुंड, देऊळघाट, पाडळी या गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी मदतीच्या मागण्या केल्या –
ओला दुष्काळ जाहीर करावा
हेक्टरी ₹५० हजार मदत द्यावी
जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी ₹२ लाख द्यावे
रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावेत
तातडीने कर्जमाफी जाहीर करावी
सरकारने जाहीर केलेली मदत “तुटपुंजी” असल्याचे सांगत काँग्रेसने ३ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे.
यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर टीका करत सपकाळ म्हणाले, “शेतकऱ्यांना मदतीत अडचण दिसते, पण अदानीसाठी फाईल सही करताना, ८८ हजार कोटींच्या महामार्गाला मंजुरी देताना अडचण का होत नाही? अजित पवार यांना लाज वाटली पाहिजे.”
फडणवीसांवर टीका करताना त्यांनी भिडे यांच्या वादग्रस्त विधानांवरून सरकार शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांपासून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
तसेच कल्याण येथील काँग्रेस कार्यकर्त्याला भाजप गुंडांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी भाजपाच्या “संस्कृतीचे” दर्शन घडते, असे सांगत काँग्रेसने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
“काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिला आहे. आजही आम्ही शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरू. भाजपा सरकारने शेतकऱ्यांचा अवमान केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा सपकाळ यांनी दिला.