आशाताई बच्छाव
मिनल हागेची दमदार झुंज – विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई
✍🏻स्वप्निल देशमुख
वानखेड :- “स्वप्न मोठं असलं की मेहनतही तितकीच मोठी करावी लागते,” हे वाक्य वानखेड (ता. संग्रामपूर) येथील कन्या मिनल अभिमन्यू हागे हिने आपल्या कृतीतून सत्य ठरवले आहे. अकोला येथील जिल्हा क्रीडा संकुल, वसंतदेसाई स्टेडियमवर 19 सप्टेंबर रोजी झालेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत मिनलने दणदणीत कामगिरी करत रौप्य पदक पटकावले.
19 वर्षे वयोगटातील -45 किलो गटात मिनलने केलेली झुंज पाहून परीक्षकांसह प्रेक्षकही भारावून गेले. मिनल सध्या राष्ट्रसंत उदयसिंह महाराज कनिष्ठ महाविद्यालय, सोनाळा येथे बारावीचे शिक्षण घेत असून अभ्यासासोबत क्रीडा क्षेत्रातही चमकत आहे.
या यशामागे तिचे सातत्यपूर्ण प्रयत्न, अपार मेहनत, खेळावरील निष्ठा आणि प्रशिक्षक नागसेन इंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे.
मिनलच्या यशाबद्दल तालुका संयोजक सुधीर मानकर व सहसंयोजक गजानन काळे यांनी अभिनंदन करून भावी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
👉 कुटुंबियांचे मत :
मिनलचे वडील अभिमन्यू हागे म्हणाले, “मुलीने कष्ट करून पदक पटकावले याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. तिच्या यशामागे तिची स्वतःची मेहनत आणि गावच्या लोकांचे आशीर्वाद आहेत. पुढे राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर ती नक्कीच नाव कमावेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
मिनलची आई भारावून म्हणाल्या, “तिने केलेल्या संघर्षाची मला साक्षीदार आहे. अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधत ती पुढे गेली. आज तिच्या यशामुळे आमच्या डोळ्यांत आनंदाश्रू आहेत.”
मिनल स्वतः ठामपणे म्हणाली, “हे यश फक्त सुरुवात आहे. आता माझं ध्येय राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकून देशासाठी पदक पटकावण्याचं आहे.”
मिनलच्या या पराक्रमामुळे संपूर्ण संग्रामपूर तालुक्यात अभिमानाचे वातावरण आहे. तिचे यश आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहे.