आशाताई बच्छाव
मानव तस्करीविरोधी जागतिक दिनानिमित्त CCDT व DLSA पुणे मार्फत बहुविभागीय जनजागृती उपक्रम
पुणे एस.टी. स्थानकावर बालकांच्या संरक्षणासाठी विविध विभाग एकत्र आले
पुणे | निवासी संपादक उमेश पाटील
Committed Communities Development Trust (CCDT) व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मानव तस्करीविरोधी जागतिक दिन (World Day Against Trafficking in Persons) निमित्त पुणे एस.टी. स्थानकावर (छत्रपती संभाजीनगर) भव्य जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात रेल्वे सुरक्षा दल (RPF), सरकारी रेल्वे पोलीस (GRP), बाल कल्याण समिती (CWC), Access to Justice आणि विविध सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग होता.
कार्यक्रमात उपस्थित DLSA पुणेच्या सचिव सौ. सोनल पाटील मॅडम यांनी सांगितले की, “मानव तस्करी ही केवळ कायद्याची बाब नाही, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. अशा मोहिमा केवळ जनजागृतीसाठी नव्हे, तर कृतीसाठीही प्रेरणादायक ठरतात.”
या उपक्रमात नागरिक, प्रवासी, दुकानदार, एस.टी. कर्मचारी, वाहक व हमाल यांना बाल तस्करी ओळखण्याचे लक्षणे, आणि अशा प्रकरणांमध्ये 1098 किंवा 1800-1027-222 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क कसा साधावा याची माहिती देण्यात आली.
गेल्या वर्षभरात CCDT ने 190 मुलांची तस्करी, बालविवाह व बालश्रमातून सुटका केली आहे. संस्थेचे कार्य मुंबई व पुणे परिसरात प्रभावीपणे सुरू असून “Just Rights for Children” या देशव्यापी नेटवर्कचे CCDT हे सक्रिय सदस्य आहेत.
कार्यक्रमात CCDT चे श्री. दीपक त्रिपाठी म्हणाले, “तस्करीविरोधी कारवाईत बचावासोबतच कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. समन्वयातूनच प्रभावी परिणाम साधता येतो.” हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एडवोकेट सुरेखा कांबळे पाटोळे यांनी मेहनत घेतली व कार्य सूत्रसंचालन कालीचरण पाटोळे सर यांनी केले व आभाराचे काम रवी कांबळे यांनी केले