आशाताई बच्छाव
मोबाईलमुळे जग जवळ आले, पण नाती दुरावली
नात्यातील ओलाव्यासह मोबाईल संस्कृतीने कॅमेरा, घड्याळ, कॅल्क्युलेटर, रेडिओ या वस्तूंचे महत्त्व अगदीच नगण्य
आजच्या आधुनिक युगात मोबाईलच्या क्रांतीमुळे जग अगदी जवळ आले आहे. परंतु याच मोबाईल संस्कृतीमुळे माणसा माणसातील नाते मात्र दुरावत चालले आहे. मोबाईलमुळे प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले आहे. मोबाईलवर संभाषणाला भरपूर वेळ आहे, परंतु माणसांना एकमेकांजवळ बसून बोलायला वेळ तेवढा मिळताना दिसून येत नाही. मोबाईल, कॉम्प्युटर आणि दूरचित्रवाणीमुळे नात्यातील जिव्हाळा दुरावला असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. नात्यातील ओलाव्यासह मोबाईल संस्कृतीने कॅमेरा, घड्याळ, कॅल्क्युलेटर, रेडिओ या वस्तूंचे महत्त्व अगदीच नगण्य केले आहे.
कधीकाळी विविध धार्मिक सोहळे तसेच घरगुती छोट्या-मोठ्या समारंभांचे फोटो कॅमेऱ्याने टिपून जतन करून ठेवले जात असत, परंतु आता मोठ्या मेगापिक्सलचे मोबाईल हातात आल्यापासून कॅमेरा हद्दपार झाला आहे. एकेकाळी हाताला घड्याळ असणे प्रतिष्ठेचे मानले जायचे. आता मोबाईलमध्येच घड्याळ असल्याने हाताला घड्याळ बांधण्याचे प्रमाण कमी झाली आहे. आता कोणी वेळ विचारली की हाताकडे न बघता खिशातून मोबाईल काढून वेळ पाहिली जाते, तर छोट्या प्रासंगिक कार्यक्रमाच्या पत्रिका न छापता मोबाईलवरूनच एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे त्या कार्यक्रमाचे निमंत्रण संबंधितांना पाठवले जाते. मोबाईलच्या क्रांतीमुळे माणूस माणसात राहिला नाही. मोबाईलमुळे माणसे दुरावली गेल्याचे चित्र आता सर्वत्र पाहायला मिळत आहे.
खरे तर मोबाईलच्या जमान्यात आता पत्रलेखन देखील कमी झाले आहे. त्यामुळे थोरा-मोठ्यांना लिहायच्या पत्रातील मजकूर सुद्धा आजच्या नव्या पिढीला माहीत नसल्याचे दिसून येते. शहरी आणि ग्रामीण भागात पूर्वी करमणुकीचे साधन म्हणजे रेडिओ होता. या रेडिओला पहिल्यांदा दूरचित्रवाणीने आणि आता मोबाईलने अडगळीत पाठवले आहे. मोबाईलमध्येच गाणी ऐकणे आणि चित्र पाहण्याची व्यवस्था असल्याने रेडिओ, टेपरेकॉर्ड आणि आत्ताच्या दूरचित्रवाणीकडे देखील दुर्लक्ष होताना दिसत आहे. जो-तो एकूणच मोबाईलमध्ये मान वाकून असल्याने घरा-घरातील संवाद देखील हरवला आहे.
दरम्यान, अगदी लहानपणापासूनच मोबाईल हातात आल्याने सध्याची लहान मुले मैदानी खेळांपासून दुरावली आहेत. सतत मोबाईलवर राहत असल्याने ही मुले एकलकोंडी होताना दिसून येतात. मानवी जीवन घरातल्या नात्यांपासून आपण दूर होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेणे अत्यंत जरुरीचे आणि गरजेचे आहे, मात्र मोबाईलच्या अतिवापरामुळे तसे होताना दिसून येत नाही. सध्या मोबाईल क्रांतीमुळे माणसा माणसात दुरावा निर्माण झाला असून, माणसे माणसांपासून दूर होत चालली आहेत. एकूणच मोबाईलच्या सध्याच्या आधुनिक युगात जग जवळ आले असले, तरी खरी संस्कृती मात्र या मोबाईलच्या क्रांतीमुळे लुप्त होत चालली असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.
मोबाईलमुळे नात्यांमधील संवाद हरवला’
मोबाईलमुळे भावनिकतेचा स्पर्श नात्यात उरला नाही, तसेच नात्यातील संवादही हरवला आहे. अर्धा तास मोबाईलची बॅटरी रिचार्ज नसेल तर आपण अस्वस्थ होतो,
✍🏻 स्वप्निल देशमुख ( पत्रकार)