🛑 ‘मेड इन इंडिया’ उत्पादन
पाहिजे -मोदींच्या भाषणातील मुद्दे🛑
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीआयआयला १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन कार्यक्रमाला संबोधित केले. करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेसंबंधी पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सगळयांचे लक्ष लागले होते. पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमाव्दारे ‘आत्मनिर्भर भारता’बद्दलचे आपले विचार मांडले.
– विकासाच्या मार्गावर अजून वेगाने वाटचाल करण्यासाठी उद्देश, समावेश, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि कल्पकता आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
– “भारताची क्षमता, प्रतिभा, टेक्नोलॉजी, संकट व्यवस्थापन, कल्पकता, शेतकरी आणि इंडस्ट्रीचे नेतृत्व करणाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे.
त्यामुळे भारत निश्चित विकासाच्या मार्गावर परतेल” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
– “करोना व्हायरस विरुद्ध लढताना अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यासाठी सरकारने तात्काळ आवश्यक पावले उचलली. दीर्घकाळाच्या दृष्टीने देशाच्या हिताचे ठरतील असे अनेक निर्णय घेतले आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत ५३ हजार कोटींची आर्थिक मदत देण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
– सुधारणांसंबंधींचे निर्णय असेच घेतलेले नाहीत. एक निश्चित विचार करुन भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेतले आहेत असे मोदी म्हणाले.
“सरकार आज ज्या दिशेने चालले आहे मग ते खाणकाम, ऊर्जा क्षेत्र, संशोधन आणि टेक्नोलॉजी असो, प्रत्येक क्षेत्रात देशातील युवकांसाठी मोठी संधी आहे” असे मोदी म्हणाले.
– विश्वास ठेवा, पुन्हा विकासाच्या मार्गावर परतणे कठिण नाही. मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही एक पाऊल टाका, मी पुढची चार पावले टाकेन असे मोदी उद्योगजगताला म्हणाले.
– देशात आता उत्पादनांची निर्मिती करण्याची गरज आहे. उत्पादन मेड इन इंडिया असले तरी ते मेड फॉर वर्ल्ड असले पाहिजे असे मोदी म्हणाले.