आशाताई बच्छाव
परळी – बीड राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या कटाड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले ; जिल्हाधिकारी यांना सादर केले निवेदन!
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी परळी – बीड राष्ट्रीय महामार्गावरील चेंबरी रेस्ट हाऊस जवळील रेल्वे उड्डाण पुलावरील सिमेंट कटाडे अनेक ठिकाणी पडले आहेत. तसेच झाडे झुडपे या मार्गामध्ये पसरले असून त्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या महामार्गावरून रहदारी करणारे दुचाकी स्वार तसेच चार चाकी वाहनांचा वारंवार अपघात होत आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्गाचे उपाभियंता यांनी सपशेल दुर्लक्ष केले आहे. सदरील काम तात्काळ सुरू करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांनी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री. अविनाश पाठक साहेब परळी येथे वैजनाथ मंदिर या ठिकाणी आले असता त्यांची भेट घेऊन सादर केले. तसेच रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. सदरील काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी साहेबांनी दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,या राष्ट्रीय महामार्गावर रहदारीचे प्रमाण जास्त आहे. या महामार्गावरून आयटीआय महाविद्यालयाचे विद्यार्थी, थर्मल पावर स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर अनेक वाहनधारक ये जा करतात याच महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांची हात, पाय मोडले आहेत. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्याची तसेच उपकार्यकारी अभियंता साहेबांनी सपशेल दुर्लक्ष केले आहे अशी तक्रार यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांना केली. याविषयी दूरध्वनी वरून त्यांच्याशी बोलले असता मला पंधरा दिवस पाहण्यासाठी वेळ नाही अशी उत्तरे एका जबाबदार अधिकाऱ्यांकडून येत आहेत ही उत्तरे शोभणारी नाहीत. लोकांच्या कामासाठी अधिकाऱ्यांना वेळ नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे उपअभियंता राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी याकडे लक्ष देतील की नाही याबाबतीत परळीकरांच्या मनात शंका आहे. त्याचबरोबर त्यांना प्रत्यक्ष भेटून आपण निवेदन सादर केले असून मागणी मान्य होईल अशी अपेक्षा आहे तसे न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग अभियान यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.