आशाताई बच्छाव
भक्तीचा भाव भावस्पर्शी असावा : गोविंद महाराज. नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
भक्ती आणि परमार्थ दाखविण्याची गोष्ट नसून त्यातील भाव आत्मसात करून जाणून घेण्याची साधना आहे. सत्संग होत असलेल्या कार्यातील वक्ता, स्थळ, काळ, ऋतू यास महत्त्व न देता जो भाविक आहे, त्या कार्याला देवाची पूजा समजून श्रवण करतो, त्याच मनात खरा परमार्थ रुजला जातो, असे विचार वेदांत उपासक गोविंद महाराज निमसे यांनी व्यक्त केले.
श्रीरामवाडी येथे आयोजित पारायण सप्ताह व कीर्तन महोत्सवातील काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. या प्रसंगी रायभान महाराज बेल्हेकर, भागवताचार्य साध्वी तुलसीदेवी, परमेश्वर महाराज इगारे, पांडुरंग महाराज
जाधव, सागर महाराज राऊत, राम महाराज कोल्हे, अशोक महाराज नरवडे, शशिकला महाराज काळे, मोहन महाराज तोगे, संजय गर्जे उपस्थित होते. उपस्थित संत-महंत व मान्यवरांचा सत्कार बजरंग तरुण मंडळ व सप्ताह कमिटीतर्फे करण्यात आला. ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी पुढील वर्षी सात ते नऊ वाजताची कीर्तन वेळ ठेवून रोज अन्नदान संकल्प करण्याचा संकल्प सांगून आभार मानले. पसायदान- आनंदवन सेवाभावी संस्थेने परिसरात होणाऱ्या सर्व पारायण सप्ताहातील काल्याच्या कीर्तनात पाणी जार देण्याची सेवा हाती घेऊन श्रीरामवाडी सप्ताहात उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.