राजेंद्र पाटील राऊत
दम असेल तर वीज तोडून दाखवाच,
राजू शेट्टींचा इशारा
कोल्हापूर: राज्यात कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेला घरगुती वीज ग्राहक पहिल्यांदाच वीज बिल माफ करण्यास सांगत असताना सरकारने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे. मात्र, दम असेल तर वीज तोडून दाखवाच, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
मिरजकर तिकटी येथील बहुचर्चित फलकाचे अनावरण आज झाले. यावेळी “महावितरण’च्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलाने चोप देत लढा तीव्र करण्याचा निर्धार झाला. यावेळी श्री. शेट्टी बोलत होते.
श्री. शेट्टी म्हणाले, “”कोल्हापुरात जी आंदोलने सुरू होतात. ती पुढे राज्यभर व्यापक होतात आणि हे आंदोलनही असेच व्यापक होऊन सरकारला गुडघे टेकायला भाग पाडेल. किंबहुना जनमताच्या रेट्यावर सरकारला वीज बील माफी द्यायला भाग पाडू.
कारण लॉकडाऊनमुळे सामान्य माणसाला कैक महिने घरात कोंडून घ्यावे लागले. रोजगार बुडाला आणि त्याचे एकूणच अर्थकारण बिघडले आहे.”
प्रताप होगाडे म्हणाले, “”वीज बिल माफी मिळेपर्यंत लढा सुरूच राहिल. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार भागावण्यासाठी कर्ज काढणारे सरकार वीजबिल माफी करताना मात्र हात आखडता घेते आहे.”
कोल्हापूर बार असोसिएशनचे रणजित गावडे म्हणाले, कोल्हापूरकरांनी टोल आंदोलन यशस्वी केले आणि आता वीज बिल माफीसाठी कोल्हापुरी पायताण हातात घेऊन प्रसंगी रस्त्यावर उतरू. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यास बार असोसिएशन न्यायालयात लढा देईल.”
यावेळी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील- किणीकर, बाबासाहेब पाटील- भुयेकर, बाबा पार्टे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, निवासराव साळोखे, भगवान काटे, सत्यजित कदम, सुनील कदम, दिलीप देसाई, सुजित चव्हाण, बाबा इंदूलकर आदी उपस्थित होते.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .