Home कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान सीमेवर शहीद

कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान सीमेवर शहीद

126
0

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामधील निगवे खालसा गावचे जवान संग्राम शिवाजी पाटील यांना आज पहाटे काश्मीरच्या राजौरीमध्ये पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या आठवड्यात आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवान ऋषिकेश जोंधळे हे सुद्धा पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. एकाच महिन्यात जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून करविर तालुक्यातील निगवे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
करवीर तालुक्यातील निगवे खालस गावचे वीरजवान संग्राम शिवाजी पाटील भारतीय सैन्यदलात २००२ साली दाखल झाले. ते निंष्णात कुस्तीपटू होते. त्यांनी अठरा वर्ष देशसेवा केली. सोळा वर्षे सेवा झाल्यानंतर ते निवृत्त होणार होते. पण पुन्हा त्यांनी तीन वर्ष सेवा देशाच्या सेवेसाठी वाढवून घेतली होती . शहीद संग्राम यांची कुटुंबीयांशी शेवटची भेट फेब्रुवारीमध्ये झाली होती. त्यानंतर ते पुन्हा परतले नाहीत. सध्या त्यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असून वारंवार ते गावाकडील मित्रांकडे व घरच्यांकडून सर्वांच्या खुशालीसह घराच्या बांधकामाची माहिती फोनवरून घेत होते. पुढील महिन्यात गावी येणार होते. व नवीन बांधलेले घर पाहणार होते , पण अखेर त्यांचे नवीन घर पाहण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. त्यांच्या पश्चात आई ,वडील, पत्नी, दोन मुले,भाऊ व बहीण असा परिवार आहे.
शहीद संग्राम यांचे शव सोमवारी कोल्हापुरात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असून त्यांच्यावर निगवे खालसा गावातील ज्या मैदानावर ते खेळले , व्यायाम व सराव केला त्याच मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार सरकारी इतमामात करण्यात येणार आहेत.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here