Home Breaking News कौळाणे (नि.) : राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण प्रकरण तापले; आंदोलनानंतर ग्रामपंचायतीची हालचाल, संबंधित...

कौळाणे (नि.) : राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण प्रकरण तापले; आंदोलनानंतर ग्रामपंचायतीची हालचाल, संबंधित व्यक्तीस नोटीस

205

Yuva maratha news

1002815670.jpg

कौळाणे (नि.) : राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण प्रकरण तापले; आंदोलनानंतर ग्रामपंचायतीची हालचाल, संबंधित व्यक्तीस नोटीस
कौळाणे (नि.) येथील ऐतिहासिक राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर झालेल्या अतिक्रमणाच्या प्रकरणी अखेर ग्रामपंचायतीला हालचाल करावी लागली असून संबंधित व्यक्तीस अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जगद्विख्यात समाजसुधारक व प्रगतिशील राजे श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीदिनी कौळाणे येथील ऐतिहासिक राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरच एका व्यक्तीने वेल्डिंगचा व्यवसाय सुरू करून अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला होता. ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी झालेल्या अतिक्रमणाविरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
या प्रकरणी कौळाणे येथील ज्येष्ठ पत्रकार तसेच युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी पुढाकार घेत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले. ऐतिहासिक वारशाचे संरक्षण व्हावे आणि राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने बुधवारी उशिरा रात्री संबंधित व्यक्तीस अधिकृत नोटीस देण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित व्यक्तीने ती नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून नियमानुसार ती नोटीस संबंधित व्यक्तीच्या घरावर लावली. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी अधिकृत प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या उपोषण आंदोलनास विविध सामाजिक व पत्रकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवत उपस्थिती लावली. यामध्ये लोकहित माहिती अधिकार पोलीस पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.भारतराज पवार , राष्ट्रीय मराठा पार्टीचे दिंडोरी लोकसभा अध्यक्ष श्री.दादासाहेब पवार, ए.बी.एन मिडिया नेटवर्कचे मुख्य संचालक श्री.अंशुराज पाटील, गुन्हेगारी पंचनामा नाशिक विभागीय संपादक श्री.विजय चांदणे सटाणा तालुका अध्यक्ष श्री दावल पगारे, चांदवड तालुका अध्यक्ष श्री.सुनील गांगुर्डे, युवा मराठा न्यूज चे मालेगाव तालुका प्रतिनिधी श्री.शुभम ओढेकर तसेच इंडियन फाउंडेशन मालेगाव पदाधिकारी श्री. विशाल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला.
यावेळी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी, कौळाणे गावचे ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच पोलीस पाटील यांचेही या संपूर्ण प्रक्रियेत मोलाचे सहकार्य लाभले.
ऐतिहासिक वारसा असलेल्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून या वास्तूचे संरक्षण करण्यात यावे, अशी ठाम मागणी राजेंद्र पाटील राऊत यांनी केली असून प्रशासनाने लवकरात लवकर ठोस कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे