आशाताई बच्छाव
तक्रारींसाठी आता थेट पोलिसांची ‘दूरदृश्य प्रणाली’ !
एएसपी नवदीप अग्रवाल (भापोसे) यांचा वाशिम उपविभागातील नागरिकांना दिलासा
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ: नवदीप अग्रवाल (भापोसे), सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग-वाशिम, यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि आधुनिक पुढाकार घेतला आहे. नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी आणि त्यांना त्यांच्या तक्रारी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडता याव्यात यासाठी एएसपी अग्रवाल यांनी त्यांच्या कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीडिओ कॉन्फरन्स) संवाद साधण्याची अभिनव व्यवस्था सुरू केली आहे. या सुविधेमुळे वाशिम उपविभागातील नागरिकांना आता घरबसल्या त्यांच्या तक्रारी मांडणे शक्य होणार आहे.
नवदीप अग्रवाल यांनी थेट संपर्क साधण्यापूर्वी नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे:
“नागरिकांनी त्यांच्या अडचणी आणि तक्रारींबाबत प्रथम संबंधित पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधावा. पोलीस ठाणे स्तरावर आपल्या तक्रारीचे समाधान न झाल्यासच क्यू आर कोडचा वापर करून एएसपी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संपर्क साधावा.”
दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधण्याची कार्यपद्धती (एसओपी):
एएसपी नवदीप अग्रवाल यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधण्याची संपूर्ण एसओपी खालीलप्रमाणे आहे:
क्यू आर कोड स्कॅनर ॲप: प्ले स्टोअरवरून क्यू आर कोड स्कॅनर ॲप डाउनलोड करावे.
क्यू आर कोड स्कॅन: उपलब्ध क्यू आर कोड स्कॅन करावा.
लिंक उघडा: कोड स्कॅन झाल्यावर दिसणाऱ्या लिंकवर क्लिक करावे.
वेळ निश्चित करा: calendly.com ही संकेतस्थळ (साईट) उघडल्यावर ‘मीटिंग विथ एएसपी’ या पेजवर जावे. दूरदृश्य संवादासाठी आपल्याला सोईस्कर असलेला मंगळवार किंवा गुरुवार यापैकी कोणताही एक दिवस निवडावा.
वेळेची निवड: दिवसाची निवड झाल्यावर आपल्याला सोईस्कर असलेली वेळ निवडून (सिलेक्ट) ‘पुढील (नेक्स्ट)’ बटण क्लिक करावे.
माहिती भरा: ‘माहिती भरा या पानावर आपले नाव, ई-मेल , भ्रमणध्वनी क्रमांक, पोलीस ठाण्याचे नाव आणि दूरदृश्य संवादाचा उद्देश ही माहिती भरून ‘कार्यक्रम निश्चित करा ‘ हे बटण क्लिक करावे.
ई-मेल लिंक: त्यानंतर आपल्या ई-मेलवर एक संदेश प्राप्त होईल. या संदेशामध्ये आपण निवडलेली वेळ आणि एएसपी नवदीप अग्रवाल यांच्याशी संपर्क साधण्यासाठीची गुगल मीट लिंक प्राप्त होईल.
दूरदृश्य संवाद: दिलेल्या वेळेत ‘जॉईन विथ गुगल मीट’ या लिंकवर क्लिक केल्यास आपण थेट सहायक पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाशी दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडले जाल.