आशाताई बच्छाव
काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदुळाचा ट्रक पकडला
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदुळाचा ट्रक खामगाव हद्दीतील पारखेड फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज 24 सप्टेंबर रोजी पकडला आहे. एकूण 26 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन ट्रक चालक मनोज भाई बनुभाई वय 53 रा. भावनगर गुजरात याला ताब्यात घेण्यात आले आहे. हा ट्रक बाळापूरकडून नांदूराकडे जात होता. जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सामान्य, गरजु, गरीब नागरीकांना वितरीत होणारा तांदुळ तसेच इतर धान्याची काळ्या बाजारात होत असलेली चोरटी वाहतूक आणि विक्री थांबवून, अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. सदर आदेशानुसार स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक करुन, त्यांना कार्यवाही करणेबाबत सुचित केले होते. दरम्यान खामगांव ग्रामीण हद्दीत स्थागुशाच्या पथकाने 24 सप्टेंबर रोजीकाळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदुळाचा ट्रक पकडून अत्यावश्यक वस्तु अधिनियम अंतर्गत कारवाई केली आहे. ट्रक क्र.GJ-23-W-7741 या ट्रकला चालकासह पकडून कारवाई केली. सदर कारवाईमध्ये वाहन चालक याचे ताब्यातून सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदुळ हस्तगत करण्यात आला. आरोपीकडून 7,65,000 रुपये किमतीचा 255 क्विंटल तांदूळ, 19,00,000 रुपये किमतीचा अशोक लेलँड ट्रक असा एकूण 26,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोउपनि पंकज सपकाळे, पोहेकॉ एजाज खान, पोकॉ. अमोल शेजोळ, विक्रांत इंगळे, चापोकॉ. शिवानंद हेलगे या पथकाने ही कारवाई केली.