आशाताई बच्छाव
गर्भवती पत्नीला भेटण्यासाठी सासरी जायला निघाला अन् वाटेतच काळानं घाला घातला; डोणगावच्या 30 वर्षीय व्हिडिओ एडिटरचा अपघातात दुर्दैवी अंत
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :– मेहकर डोणगाव एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गर्भवती पत्नीला सासुरवाडीत भेटण्यासाठी निघालेल्या एका 30 वर्षीय तरुणाचा मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 22 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणाचे नाव रुपेश दशरथ करवते असे असून तो मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी होता. व्यवसायाने तो व्हिडिओ एडिटर म्हणून काम करीत होता. 21 सप्टेंबर रोजी रात्री तो डोणगाव येथून अकोला जिल्ह्यातील नवेगाव येथे
पत्नीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता. विठ्ठलवाडी परिसरात जात असताना अचानक समोर आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे रुपेशचा तोल जाऊन तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दुचाकीही गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाल्याचे दिसून आले. अकस्मात झालेल्या या अपघाताने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.