आशाताई बच्छाव
लाचखोर तहसीलदार हेमंत पाटील यांना जामीन मंजूर ! – अॅड. शर्वरी सावजी – तुपकर यांचा प्रभावी युक्तीवाद !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा मोताळा तहसीलदार पदी कार्यरत असलेले हेमंत पाटील यांना वर्ग दोन मधील जमीन वर्ग एक मध्ये समाविष्ट करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दरम्यान त्यांच्या जामिनावर सुनावणी होती. यावेळी त्यांच्या वतीने अॅड. शर्वरी सावजी-तुपकर यांनी प्रभावी बाजू मांडत युक्तिवाद केला. त्यामुळे न्यायालयाने तहसीलदार हेमंत पाटील यांची ५० हजाराच्या जात मुचलक्यावर जमानत मंजूर केली हे विशेष..!
मोताळा तालुक्यातील रोहीणखेड येथील तक्रारदार ऋषिकेश पाटील यांनी अकोला लाच लुचपत विभागाकडे मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांची तक्रार केली होती. ऋषिकेश पाटील यांच्या मामाची थड येथील गट नंबर २३ मधील ०१.६२ हेक्टर आर शेत जमीन सातबारा उताऱ्यावर भोगवटदार वर्ग दोन मधून वर्ग एक वर
करावयाची होती असे त्यांचे म्हणने होते, यासाठी त्यांच्या मामाने तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता. परंतु त्यांचे मामा अशिक्षित असल्याने तक्रारदार ऋषिकेश पाटील हे त्या प्रकरणात लक्ष घालत असल्याचे त्यांनी सांगितले व त्यांनी स्वतःचे नावे इसारपावती देखील करून घेतली होती. तहसीलदार हेमंत पाटील यांनी सदर जमीन वर्ग दोन मधून वर्ग एक करण्यासाठी एकूण दोन लाख रुपये लाचेची मागणी केली असा आरोप
पाटील यांनी केला आहे. त्यानुसार अकोला एसीबीच्या वतीने तहसीलदार हेमंत पाटील यांच्या बुलढाणा येथील राहत्या घरी १३ सप्टेंबर रोजी पडताळणी केली त्यात लाचेची मागणी निष्पन्न झाल्याने १४ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरी सापळा रचला असता हेमंत पाटील यांनी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारली असा आरोप फिर्यादी ने केला. मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी ती रक्कम टॉयलेट मध्ये फेकून त्यावर पाणी टाकले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असाही आरोप होता. घर झडती दरम्यान त्यांचे घरात ४ लाख ७५ ह.रु ची रक्कम मिळून आली. त्या रकमेबाबत हेमंत पाटील व त्यांचे कुटुंबातील सदस्यांना स्पष्टीकरण देता आले नाही. म्हणून त्यांच्यावर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ७ व भारतीय न्याय संहिता चे कलम २३८, ६२ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. एसीबीच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी हेमंत पाटील यांना विशेष न्यायालय बुलडाणा येथे हजर करण्यात आले आणि १० मुद्द्यावर पीसीआरची मागणी करण्यात आली. दरम्यान दुसरीकडे हेमंत पाटील यांच्या वतीने ऍड शर्वरी सावजी -तुपकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. ऍड शर्वरी सावजी यांनी एसीबीने मांडलेले १० मुद्दे खोडून काढत प्रभावी युक्तिवाद केला, त्यामुळे न्यायालयाने केवळ घरात सापडलेले ४, ७५०००रु कुठून आले ह्याचा तपास करणेकामी दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केली. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी आरोपी असलेले हेमंत पाटील यांना परत न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली.. त्यानंतर ऍड शर्वरी सावजी-तुपकर यांनी आरोपी चे वतीने जमानत मिळणे कामी अर्ज सादर केला. त्यावर न्यायालयाने एसीबीचे म्हणणे मागवले पण एसीबी ने त्या दिवशी आपले म्हणणे दिले नाही, त्यामुळे दुसरे दिवशी १८ सप्टेंबर रोजी सुनावणी नेमण्यात आली. परंतु त्या दिवशी देखील एसीबीचे तपास अधिकारी मासिक आढावा बैठकी साठी अमरावती येथे गेले असल्याचे कारण पुढे करत एसीबीने परत तारीख वाढवून घेतली. त्यामुळे १९ सप्टेंबर रोजी सुनावणी नेमण्यात आली. तहसीलदार हेमंत पाटील यांची सहजासहजी जमानत होणार नाही याचा पूर्णपणे बंदोबस्त एसीबीने केला होता. परंतु लाचलुचपत संबंधातील केसेसमध्ये विशेष हातखंडा असलेल्या ऍड शर्वरी सावजी -तुपकर यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि अभ्यासू पद्धतीने आरोपी हेमंत पाटील यांच्या बाजूने युक्तिवाद केला. आपल्या अशिलाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले असून फिर्यादी हा आरोपीचा जवळचा नातेवाईक असून त्याचे आरोपीचे घरी कायम येणे जाणे असतें व त्याला आरोपीच्या घरात कुठे कोणती खोली आहे हे पुरेपूर माहित होते, त्यानेच आपले अशिलाचे घरातील टॉयलेट मध्ये रक्कम टाकली असल्याचे युक्तीवादात ऍड शर्वरी यांनी म्हंटले. तसेच त्याचे कोणतेही काम आपल्या अशिला कडे प्रलंबित नव्हते, संबंधीत जमीन मालक माळी समाजाचा तर फिर्यादी कुणबी समाजाचा आहे तर ते एकमेकांचे नातेवाईक कसे..? तसेच फिर्यादीचे कुटुंब राजकारणात सक्रिय आहे, त्यामुळे आकस बुद्धीने त्याने खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतविले आहे, असे मुद्दे उपस्थित करत ऍड शर्वरी सावजी – तुपकर यांनी जमानातीची विनंती केली. याउलट सरकारी वकिलांनी जमानत अर्ज फेटाळण्याची विनंती केली व आरोपीवर हा दुसरा ट्रॅप असल्याचे न्यायालयाचे लक्षात आणून दिले. परंतु ऍड शर्वरी सावजी -तुपकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी हेमंत पाटील यांना ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जमानत मंजुर केली, हे विशेष..!