आशाताई बच्छाव
सौरऊर्जेवर चालणाऱ्या मल्टीपरपज कोल्ड स्टोरेजमुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
पुणे येथील कांदा धोरण समितीच्या बैठकीत सौ. सुवर्णाताई जगताप यांचे प्रतिपादन
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे
राज्यातील कांदा दरात स्थिरता राखणे तसेच शेतकरी, ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे समतोल हित जोपण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या कांदा धोरण समितीची तिसरी बैठक गुरूवार, दि. 07 ऑगस्ट, 2025 रोजी राष्ट्रीय कांदा आणि लसुण संशोधन केंद्र, राजगुरुनगर, जि. पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीस राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा. पाशा पटेल अध्यक्षस्थानी होते.
सदर बैठकीत लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ. सुवर्णा जगताप यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या मल्टीपरपज कोल्ड स्टोरेजच्या विषयावर महत्त्वपूर्ण संकल्पना मांडणी करून असे सांगितले की, पारंपारीक कांदा चाळीत साठवलेला कांदा उष्णता, आर्द्रता व कीटकांमुळे खराब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या समस्येवर उपाय म्हणून सौरउर्जेवर चालणाऱ्या आधुनिक मल्टीपरपज कोल्ड स्टोरेजची उभारणी करावी. जेणेकरून शेतकऱ्यांचे कांद्याचे नुकसान टाळण्यास मदत होईल. तसेच या सुविधेमुळे कांद्याबरोबरच इतर फळे व भाजीपालाही सुरक्षितपणे साठवता येईल.कोल्ड स्टोरेजमध्ये नियंत्रित तापमान व आर्द्रतेमुळे शेतीमाल जास्तीत जास्त दिवस टिकवता येतो. त्यामुळे शेतकरी बाजारभाव वाढेपर्यंत शेतीमाल विक्रीसाठी थांबू शकतात आणि आपल्या शेतीमालाचे योग्य मूल्य मिळवू शकतात. महत्वाचे म्हणजे हे कोल्ड स्टोरेज सौरऊर्जेवर चालत असल्यामुळे विद्युत खर्चात लक्षणीय बचत होईल. तसेच पारंपारिक विजेवर चालणाऱ्या कोल्ड स्टोरेजच्या तुलनेत हे अधिक पर्यावरणपूरक व किफायतशीर आहे.
शासनाच्या विविध योजना व अनुदानांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी पारंपारीक साठवणुक पध्दतीचा त्याग करून या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करावा असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. तसेच अशा प्रगत सुविधा ग्रामिण भागात उपलब्ध झाल्यास शेती अधिक शाश्वत आणि नफ्याची ठरू शकते असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.सदर बैठकीस राज्य कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, लासलगांव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप, शेतकरी प्रतिनिधी दिपक पगार, कला बायोटेकचे पदाधिकारी, निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनचे (गोदाम) कमांडर अजय जादु, पणन मंडळाचे सदस्य सुहास काळे आदि उपस्थित होते.






