आशाताई बच्छाव
शेवरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी – तातडीने उपचारासाठी मालेगाव येथे हलवले सटाणा,दावल पगारे तालुका प्रतिनिधी
ता. बागलाण (जि. नाशिक) येथील मौजे शेवरे गावात बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. श्रीमती मनीषा राजेंद्र सोनवणे, वय 32 वर्षे, रा. शेवरे, ह्या दि. __ रोजी सकाळी अंदाजे 12 वाजता श्री कुंभार या शेतकऱ्याच्या शेतात मका निंदणी करण्यासाठी मजुरीस गेल्या होत्या.
याच दरम्यान, अचानक बिबट्याने हल्ला करून त्यांच्या कपाळावर, भुवईवर, गालावर व हातावर पंज्याने जखमा केल्या. तात्काळ त्यांना अंतापूर येथील खैरनार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर 23 टाके टाकून प्राथमिक उपचार करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी श्री डी. एम. शरमाळे, वनपाल श्री गवळी, वनरक्षक श्री संदीप गायकवाड, श्री निलेश कोळी, श्री माणिक मोरे, श्री देवकाटे व वनमजूर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी महिलेला ताहराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारांसाठी त्यांना मालेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने मदतकार्य करून जखमीस शासकीय आरोग्य सेवेमार्फत तातडीने उपचार मिळवून दिले. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून वनविभाग पुढील आवश्यक कार्यवाही करत आहे.