आशाताई बच्छाव
नाशिक प्रतिनिधी मुकुंदा चित्ते
शहरात तोतया पोलीसांनी धुमाकूळ घातला असून, रस्त्याने पायी जाणा-या ७० वर्षीय वृध्देची वाट अडवित भामट्यानी पावणे चार लाख रूपये किमतीचे दागिणे लांबविले. ही घटना वडाळा पाथर्डी मार्गावरील गुरूगोविंद सिंग कॉलेज परिसरात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमल तुकाराम भदाणे (७० रा. श्याम मार्बल जवळ सराफनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भदाणे या शुक्रवारी (दि.११) सकाळच्या सुमारास वडाळा पाथर्डी रोडवरील ब्रम्हाकुमारी केंद्रात गेल्या होत्या. गुरू गोविंद कॉलेज समोरील रस्त्याने त्या ओम शांतीच्या शिबीरासाठी जात असताना ही घटना घडली. भामट्याने आवाज देवून भदाणे यांची वाट अडविली. यावेळी त्याने रस्त्याच्या बाजूला उभे असलेले हेल्मेटधारी पोलीस असल्याची माहिती देवून हातचलाखीने दागिणे लांबविले.
चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सुरक्षेच्या दृष्टीने अलंकार काढून ठेवण्याचा सल्ला देत संशयिताने मदतीच्या बहाण्याने सुमारे ३ लाख ७० हजार रूपये किमतीचे दागिणे पळविले. त्यात सोनसाखळी, दोन अंगठ्या व बांगड्या आदी अलंकाराचा समावेश आहे. अधिक तपास उपनिरीक्षक फुंदे करीत आहेत.