आशाताई बच्छाव
खडतर संघर्षाच्या वाटेवरील प्रवासी, “जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी” मा.श्री.राजेंद्र पाटील राऊत
लेखन: श्रीमती आशाताई बच्छाव
उद्या रविवार दिनांक २९ जुन २०२५ रोजी नाशिक येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वयाची पन्नाशी ओलांडलेल्या व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे,त्यात युवा मराठा न्यूज चॅनल नेटवर्कचे मुख्य संपादक व आश्रयआशा फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांचाही “जीवनगौरव पुरस्कार” देण्यात येऊन सन्मानित केले जाणार आहे.त्याविषयी थोडेसे….
राजेंद्र पाटील राऊत या व्यक्तीच्या कामाची पध्दत अगदी आगळीवेगळी व सर्वसामान्य माणसाला निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.घरातून कुठल्याही प्रकारे सामाजिक अथवा राजकीय वारसा नसताना सुद्धा या माणसाने अगदी कुणाचेही पाठबळ नसताना स्वकर्तृत्वावर विविध मार्गांनी जनसामान्यांच्या हक्कासाठी अहोरात्र संघर्ष उभा केला.जेथे जेथे अन्याय दिसला, त्याला वाचा फोडून प्रबोधनातून जनजागृती करून न्यायासाठी सदैव “सत्याची बाजू मांडणारा” हा अवलिया राजेंद्र पाटील राऊत अनेकांच्या सुख दुःखात धावून जाणारा गोरगरीबांचा खरे अर्थाने आयडाँल ठरला.सामाजिक कार्य करीत असताना संपूर्ण महाराष्ट्रातल्या छतीस जिल्ह्यातील सगळयाच तालुक्यात मोठे नेटवर्क उभे करून, पैश्याच्या श्रीमंती पेक्षा माणूसकीने माणूस म्हणून जोडलेली मानवतेसाठी लढणारी आपुलकीची माणसं जमविली.विविध प्रश्नांवर लढताना, संघर्ष करताना अनेकांना न्याय मिळवून दिला.महाराष्ट्रभरातील बहुजन समाजाच्या गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून देताना सगळी माणसं आपलीच आहेत या ध्येयाने प्रेरित होऊन राजेंद्र पाटील राऊत यांनी संघर्षातून मुलूखावेगळी कर्तबगारी करून दाखविली.अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे जन्म झालेल्या राजेंद्र पाटील राऊत यांचे वडील शासकीय नोकरीत असताना अचानक त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने अवघ्या दिड वर्ष वय असलेल्या राजेंद्र पाटील राऊत यांना त्यांच्या आईने माहेरी (आजोळी) कौळाणे (नि) येथे आणून लहानाचे मोठे केले.या काळात संघर्षातून जीवन घडविणे पाहिजे तेवढे सोपे नव्हते.मात्र पाठीशी कुणाचा आधार नाही,नातेवाईकांचे पाठबळ नाही अशाही परिस्थितीत राजेंद्र पाटील राऊत यांनी संघर्षाला आपलेसे करून काटेरी वाटेवरून सुरू केलेली वाटचाल पडत धडपडत चालणे सुरुच ठेवले त्यामुळे राजेंद्र पाटील राऊत यांच्या संघर्षाला व केलेल्या त्यागाला एक वेगळीच झळाळी निर्माण झाल्याचे बघावयास मिळते आहे.फुलाला कधीच स्वतः च्या सुगंधाची जाहिरात करावी लागत नाही अगदी त्याचप्रमाणे राजेंद्र पाटील राऊत यांचे सामाजिक कार्य हेच त्यांची जाहिरात असून, अनेक पुरस्काराचे मानकरी असलेले राजेंद्र पाटील राऊत यांना नाशिक येथे उद्या मिळत असलेला मनूमानसी महिला बहुउद्देशीय संस्था व महावीर इंटरनँशनलचा “जीवनगौरव पुरस्कार २०२५” हा राजेंद्र पाटील राऊत यांच्या संघर्षाचा खरे तर सन्मान आहे, असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरू नये.खडतर वाटेवरून वाटचाल करताना प्रसंगी कडू गोड आठवणींचे घोट पीत असताना मान अपमान सगळ्यांचं प्रसंगांना सामोरे जाऊन हा जिद्दी, स्वाभिमानी, एकनिष्ठ असणारा राजेंद्र पाटील राऊत जिद्द, हिंमत, आत्मविश्वास या त्रिसुत्री विचारांच्या आधारावर संपूर्ण महाराष्ट्रात “युवा मराठा न्यूज नेटवर्क”च्या नावाचे वादळ उभे करतो हे नक्कीच अभिमानास्पद आहे.राजेंद्र पाटील राऊत यांच्या जीवनातील खडतर संघर्षमय वाटचालीचा सन्मान म्हणून त्यांच्या जीवनाचा “जीवनगौरव पुरस्कार २०२५”मिळत असल्याने त्यांचे जीवन सार्थकी झाल्याचे आंतरिक समाधान असून, त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभकामनासह हा शब्दयात्रेचा प्रवास येथेच थांबविते.






