आशाताई बच्छाव
कामाचे ठिकाणी लैंगिक अत्याचार गंभीर स्वरूपाचा गुन्हा – अॅड. महेंद्र गोस्वामी
संजीव भांबोरे
भंडारा- कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार होत असतील तर तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. हे गुन्हे सिद्ध झाल्यास दंड अथवा नोकरीतून कमी करण्याचीही कारवाई केली जाऊ शकते, असे प्रतिपादन अॅड. महेंद्र गोस्वामी यांनी ग्रामीण रुग्णालय येथील महिला सुरक्षा कार्यशाळेत केले.
ग्रामीण रुग्णालय येथे (दि. ३०) ला महिला तक्रार निवारण समितीतर्फे रूग्णालयातील महिला कर्मचारी आणि शिकाऊ विद्यार्थ्यांसाठी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या अनुषंगाने घालून दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वावर कार्यशाळेचे आयोजन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ धीरज लांबट यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी न्यायाधीश ॲड.महेंद्र गोस्वामी उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विनय मासुरकर, समितीचे पदाधिकारी डॉ.संगीता देशमुख,शाहिद अली,डॉ.माधुरी खोब्रागडे, परिचारिका ललिता अल्ललीवार, रविकांत वाढाई,जगदीश कामडी प्रमुख्याने उपस्थितीत होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक ॲड.महेंद्र गोस्वामी म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या अनुषंगाने घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने 19 सप्टेंबर 2006 रोजी शासन निर्णय पारित केला. त्यामध्ये शासकीय, निमशासकीय सेवेतील महिला कर्मचार्यांच्या लैंगिक छळाच्या समस्यांची तपासणी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि त्या अनुषंगाने सर्व कार्यालयात, संस्थात समित्या स्थापन करण्याचे आदेश आहे महिला जर त्यांचे कार्यालयामध्ये लैंगिक छळाला सामोरे जात असतील तर त्यांनी पुढे येऊन न घाबरता तक्रार करा, असे आवाहन केले.तसेच अधिनियम 2013 अंतर्गत विविध कलमांची माहिती दिली. तसेच कामाचे ठिकाण, छळांचे प्रकार, तक्रार कोठे व कशी करावी, अंतर्गत तक्रार निवारण समितीचे कार्य, तक्रारीचे निराकरण,स्थानिक तक्रार निवारण समितीचे कार्य ,याची सविस्तर माहिती देण्यात आली.
सदर प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रास्ताविक न्युरोथेरपिस्ट शाहिद अली यांनी केले. सूत्रसंचालन गीता तलवेकर , आभार प्रदर्शन माधुरी रामटेके यांनी केले.सदर कार्यशाळेस ग्रामीण रुग्णातील डॉक्टर, कर्मचारी,परिचारिका व महिला कर्मचारी उपस्थित होते.