आशाताई बच्छाव
एस.एन.मोर महाविद्यालयातील डॉ. मोरे यांना इंग्लंडचे पेटंट
संजीव भांबोरे
भंडारा- गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरी देवी सराफ विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रा.डॉ.व्यंकटेश मोरे यांना नुकतेच इंग्लंड मधील पेटंट मिळाले आहे. वाणिज्य व उद्योग क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान शोधल्याबद्दल सदरील पेटंट देण्यात आले आहे.
वाणिज्य व उद्योग क्षेत्रामध्ये उत्पादित मालाचा साठा करणे आणि त्याचे सुनियोजन करणे अत्यावश्यक असते. त्यासाठी एआय- पॉवर्ड इन्वेंटरी मॅनेजमेंट डिव्हाईस मशीन लर्निग व रिअल टाइम डेटा वापरावा लागतो. यासाठी स्टॉक ट्रॅकिंग स्वयंचलित करण्याच्या तंत्राचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. या मॉडेलचे डिझाईन पेटंट हे महाराष्ट्रातील वाणिज्य विभागाच्या काही प्राध्यापकांना मिळाले आहे. यामध्ये तुमसर येथील प्रा. डॉ. व्यंकटेश मोरे यांचा समावेश आहे.
सदरील तंत्रज्ञान मॉडेल उत्पादित मालाच्या मागणीचा अंदाज लावणे आणि मालाची नासधूस कमी करण्यासाठी मदत करते. उत्पादनाच्या पुनर्संग्रहाचा सदुपयोग करण्यासाठी संग्रह पातळी, विक्रीतील चलन आणि पुरवठा साखळी घटकांचे निरीक्षण करण्याचे काम करते. तसेच शिल्लक उत्पादनाची हालचाल, उत्पादन कालबाह्यता, अंतिम तारखा आणि पर्यावरणीय परिस्थिती ट्रॅक करण्यासाठी हे उपकरण आयओटी सेन्सर्ससह देखील एकत्रित करण्याचे काम करते.
राज्यातील विविध महाविद्यालयात कार्यरत असणारे प्राध्यापक डॉ. व्यंकटेश दिगंबरराव मोरे (एस.एन.मोर कॉलेज तुमसर जि.भंडारा), डॉ. दिलीप चव्हाण (स.भू. कला व वाणिज्य महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर), डॉ. सचिन प्रकाश पवार (पीपल्स कॉलेज नांदेड), डॉ.सद्दाम रबानीसाब सय्यद (एम.बी.पटेल कॉलेज, सडक अर्जुनी जि.गोंदिया), डॉ. भगवान हणमंत मोहिते (पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय कवठेमहंकाळ जि.सांगली), डॉ रामदास नागोजी बोलके (कणकवली महाविद्यालय सिंधुदुर्ग) या प्राध्यापकांनी पेटंट तयार करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
तुमसरातील एस.एन.मोर महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रा.डॉ.व्यंकटेश मोरे यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पातळीवर पेटंट मिळाल्याबाबत गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. वर्षाताई प्रफुल पटेल, माजीमंत्री खा. प्रफुल पटेल, संस्थेचे सचिव श्री. राजेंद्र जैन, संचालक श्री.निखिल जैन, कॉलेजचे कार्यकारी प्राचार्य डॉ.के.एन.साठवणे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.