आशाताई बच्छाव
आगामी मान्सूनच्या पार्शभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचा आढावा
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रशासनाला दिले निर्देश
(पुणे प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाळ्यात घडणाऱ्या घटनांसह कोणत्याही आपत्तीला सक्षमपणे हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी शासनाने पूरग्रस्तांना दिलेली मदत वेळेत पोहोचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याची खबरदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.आगामी मान्सूनच्या पार्शभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचा आढावा विधानसभा अण्णा बनसोडे यांनी आज घेतला. महापालिकेच्या दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस महापालिका, पोलीस, पाटबंधारे, महावितरण, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम अशा विविध आस्थापनांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यामध्ये महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासह पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. डी. आव्हाड, उप आयुक्त बापू बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार जयराज देशमुख, महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सह शहर अभियंता बापू गायकवाड, देवन्ना गट्टूवार, मनोज शेठीया, विजयकुमार काळे, अजय सूर्यवंशी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, उपायुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, मनोज लोणकर, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अजिंक्य येळे, अमित पंडित, किशोर ननवरे, श्रीकांत कोळप, शीतल वाकडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, जलसंपदा विभागाचे अनिकेत हसबनीस, किशोर चव्हाण, माणिक शिंदे, पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डूबल, माजी नगरसेविका स्वाती काटे आदी उपस्थित होते.लोकहितासाठी शासन काम करीत असते. त्यादृष्टिने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपली भूमिका जबाबदारीने बजवावी. सध्या बेमोसमी पाऊस सुरू आहे. शिवाय लवकरच पावसाळा सुरू होत आहे. वारंवार पूराने बाधित होणाऱ्या ठिकाणांसह मोठ्या प्रमाणावर पाणी साचणाऱ्या भागांचा सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रीतपणे पाहणी करून त्याचा सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या अल्पकालीन उपाययोजना तात्काळ केल्या पाहिजेत. तसेच वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना आखून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आराखडा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात तफावत असता कामा नये. नदीच्या काठ परिसरातील रहिवासी भागात पुराचा धोका संभवतो. तर काही ठिकाणी नाल्यांमधील पाणी देखील नागरिकांच्या घरात शिरते. अशावेळी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहून तात्काळ तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व प्रशासकीय आस्थापनांनी समन्वयाने काम करावे. आवश्यक त्याठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करावा. आवश्यकतेनुसार त्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे. स्थलांतरीत करण्यात आलेल्या निवारा केंद्रांच्या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असतील याची खात्री करावी. शिवाय त्याठिकाणी वास्तव्यास आलेल्या नागरिकांना भोजन, वैद्यकीय सुविधेसह सर्व प्राथमिक सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश बनसोडे यांनी दिले.
नागरिकांना विश्वासात घेऊन आपत्कालीन परिस्थितीची पूर्वकल्पना देण्यासाठी यंत्रणा तैनात ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. पिंपरीतील लालटोपीनगर, एमआयडीसी, दापोडी, संजय गांधी नगर, कासारवाडी अशा भागातील नागरिकांना पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीला वारंवार सामोरे जावे लागते. त्यामुळे त्याभागात प्रभावी नियोजन करण्याच्या सूचनाही उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिल्या.यानंतर उपाध्यक्ष बनसोडे यांनी पुराने दरवर्षी बाधित होणाऱ्या पिंपरी येथील संजय गांधी नगर तसेच रिव्हर रोड परिसराला भेट दिली. तसेच याभागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या भेटीवेळी आयुक्त शेखर सिंह यांच्यासह उप आयुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे आदी उपस्थित होते.