आशाताई बच्छाव
पुणे उमेश पाटील ब्युरो चीफ- पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी यांच्याविरोधात त्यांची सख्खी बहीण सुगंधा हिरेमठ यांनी थेट न्यायालयात गंभीर आरोप केले आहेत.
सुगंधा हिरेमठ यांनी गुरुवारी पुणे दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दावा केला की, बाबा कल्याणी यांनी त्यांच्या आई सुलोचना हिरेमठ यांच्या समाधीच्या संदर्भात खोटी माहिती देत न्यायालयाची फसवणूक केली आहे.
सुगंधा यांचे म्हणणे आहे की, केशवनगरमधील जमिनीचा एकदा स्वःतः मालकी हक्क सांगणारे बाबा, आता मात्र तीच जमीन कंपनीच्या नावावर असल्याचे कोर्टात सांगत आहेत. त्यांनी जाणूनबुजून भूमिका बदलल्याचा आरोप त्यांनी केला.
फेब्रुवारी १३, २०२५ रोजीच्या सुनावणीत समेटासाठी बैठक घेण्याची तयारी बाबांनी दर्शवली होती. बैठकीत त्यांनी सांगितले की, काशीच्या जंगमवाडी मठात आईच्या नावाने शिवलिंग स्थापन केले आहे. मात्र, सुगंधा यांनी प्रत्यक्ष काशीला जाऊन पाहणी केली आणि लाखो शिवलिंगांमध्ये अशी कोणतीही समाधी नसल्याचे निदर्शनास आणले.
यासंदर्भात बाबा कल्याणी यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, सर्व विधी धार्मिक गुरूंच्या मार्गदर्शनात पार पडले असून सर्व भावंडांमध्ये चर्चा अपेक्षित होती, पण त्यांचा धाकटा भाऊ उपस्थित राहू शकला नाही.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ जून रोजी होणार आहे.
या कुटुंबीय वादाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कोर्ट काय निर्णय देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.