आशाताई बच्छाव
शब्दगंध कडून लिहित्या हातांना बळ : शर्मिला गोसावी
अहिल्यानगर ( प्रतिनिधी ) : नवोदित लेखक, कवी,विद्यार्थी यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचे काम केल्या बावीस वर्षांपासून शब्दगंध करत असुन अनेक लिहित्या हातांना बळ मिळत आहे, मराठी भाषा संवर्धन करण्याचे प्रयत्न या माध्यमातून होत आहेत.असे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदे च्या राज्य कार्यकारणी सदस्या शर्मिला गोसावी यांनी केले.
पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर येथील पदवीत्तर (एम.ए.मराठी भाग एक व दोन ) या वर्गाचे विद्यार्थ्यांनी शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या कार्यालयीन कामकाजाचे प्रशिक्षण घेतले.त्यावेळी समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.
वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूल, कॉटेज कॉर्नर येथे झालेल्या या कार्यक्रमास संस्थापक सचिव सुनील गोसावी, सारडा महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्रा.डॉ.प्रतिक्षा गायकवाड,कवी सुभाष सोनवणे उपस्थित होते.पुढे बोलताना शर्मिला गोसावी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी अभ्यासा बरोबरच विविध छंद,कला जोपासल्या पाहिजेत, त्यामुळे भविष्यकाळत प्रगतीचे शिखर गाठता येते.
सुभाष सोनवणे यावेळी बोलताना म्हणाले की, शेवगाव महाविद्यालयात असतानाच सुनील गोसावी, भगवान राऊत, शर्मिला ताई यांनी शब्दगंध ची स्थापना केली.विविध साहित्यिक मित्रांना एकत्र घेऊन सुरू केलेल्या या संस्थेचा आता राज्यस्तरावर विस्तार झालेला आहे.राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे कार्य आता विस्तारत आहे, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद,चर्चासत्र, काव्य संमेलन,कथाकथन, साहित्य संमेलन असे विविध उपक्रम शब्दगंध च्या वतीने राबविण्यात येतात. त्यामुळे नवोदित लेखक, कवी यांनी शब्दगंध मध्ये सहभागी व्हावे.यावेळी प्रा.डॉ.प्रतिक्षा गायकवाड यांनी पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
यावेळी आदर्श परदेशी, दीपक शिरसाठ या विद्यार्थ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.शेवटी डॉ. तुकाराम गोदकर यांनी आभार मानले.