
आशाताई बच्छाव
परळीत नगर परिषदेकडून होणाऱ्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार जोमात तर प्रशासन कोमात!
मोहन चव्हाण
उपजिल्हा प्रतिनिधी बीड
बीड/परळी दि. २५ मार्च २०२५ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ नगर परिषदेकडून शहरातील मिलींद नगर परिसरात होत असलेल्या रस्ते बांधणी कामात भ्रष्टाचार होत असून होत असलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे मत मिलींद नगर येथील नागरीकांकडुन येत आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ नगर परिषद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेली असते. परळी वैजनाथ नगर परिषदेकडून शहरातील विविध प्रकारच्या योजना असतील किंवा सार्वजनिक कामे असतील ही निकृष्ट दर्जाची करत असल्याचे अनेक प्रकार या अगोदर उघडकीस आले आहेत. परंतू राजकीय वरदहस्त लाभलेल्या परळी वैजनाथ नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी हे शहरातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्याऐवजी सर्वसामान्य जनतेला जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे मत जनतेतून येताना दिसून येते. तसेच शहरातील मिलींद नगर येथील बौद्ध विहार ते रेल्वे रूळाच्या हद्दिपर्यंत असलेल्या रस्त्याचे बांधकाम करत असताना केलेले सिमेंट कॉंक्रीटीकरण हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्ता लेवल मध्ये न करता रस्त्याची जाडी कमी जास्त करण्यात आली असून सिमेंट अतिशय कमी प्रमाणात वापरल्याने रस्त्याला भेगा पडल्या असल्याचे मत मिलिंद नगर येथील नागरीकांकडुन येत आहे. दरम्यान परळी वैजनाथ नगर परिषदेचे बांधकाम अभियंता ढवळे यांनी काम पूर्ण होण्या आधीच संबंधित गुत्तेदार आणि मिलिंद नगर येथील नागरिकांना काम उत्कृष्ट दर्जाचे झाले असल्याचे सांगितले असल्याचे मत नागरीकांकडुन येत आहे. या प्रकारामुळे हा रस्ता किती दिवस टिकेल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी याच मिलिंद नगर परिसरातील नागरिक पाणी प्रश्न घेऊन नगर परिषदेत गेले असता येथील कर्मचारी आणि अधिकारी यांनी तब्बल आठ दिवसांनंतर पाणी पुरवठा चालू केला. नगर परिषदेच्या अशा या गलथान कारभाराळामुळे नागरिकांमध्ये नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे, तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.