आशाताई बच्छाव
पोलीस अधिकाऱ्याच्या शासकीय भूखंडावरील कथित अतिक्रमण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
युवा मराठा न्यूज बुलडाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा::-मोताळा तालुक्यातील कोथळी (पलढग) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील घटना शासकीय मालमत्ता क्रमांक १७८ वर पोलिस विभागातील कार्यरत कर्मचारी मनोहर सूपर्डा गोरे यांनी कथितरित्या बेकायदेशीर अतिक्रमण करून शासकीय भूखंड हडपल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील राजेंद्र ठोंबरे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर प्रशासकीय निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे.
गावातील सार्वजनिक विकासकामांसाठी नियोजन करण्यात येत असून, अतिक्रमणमुक्ती मोहीम राबविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. मात्र, या मोहिमेला पोलिस कर्मचारी गोरे व त्यांच्या पत्नी अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे. गावातील अन्य अतिक्रमणधारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण हटवण्यास सहमती दर्शवली असताना, काही जण पोलिस कर्मचाऱ्याच्या मदतीने विरोध करत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
यासोबतच, गोरे यांनी पोलिस विभागातील पदाचा गैरवापर करून शासकीय जागेवर बेकायदेशीर ताबा घेतल्याने, त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करावी आणि त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित भूखंडाचा दस्तऐवज (नमुना ८) तक्रारीसोबत जोडण्यात आला असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयालाही निवेदन देण्यात आले आहे.
ग्रामस्थांनीही या प्रकरणात लक्ष घालून गावाचा विकास मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आता पोलीस प्रशासन या तक्रारीवर काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.






