
आशाताई बच्छाव
दुर्गाबाई डोहाच्या यात्रेत अंनिस च्या प्रबोधनाची ३० वर्षे
अलौकिक शक्तीचा दावा करणाऱ्यांची संख्या घटली – हरिभाऊ पाथोडे
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात साकोली पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभली गावाजवळ चुलबंद नदीचे किनारी दुर्गाबाई डोहावर यात्रा भरते. या यात्रेत सभोवतालच्या परिसरातून अंगात देवी-देवतांचा संचार झाला आहे असे समजणारे स्त्री- पुरुष वाजत-गाजत येतात.नदीच्या पात्रात डुबकी मारतात.काही अलौकिक शक्तीचा दावा करत हातावर कापूर पेटवतात. गावात जाऊन जादुटोणा,करणी,भूत भानामती या अस्तित्वहीन गोष्टींचा प्रचार प्रसार करतात. तिस वर्षांपूर्वी अंदाजे चारशे-पाचशे तथाकथित देव्या हजेरी लावत असत. यांच्यामुळे परिसरात अंधश्रद्धांचे थैमान माजले होते.
महाराष्ट्र राज्याला संताचा वारसा आहे.संत गाडगेबाबा सारखे संत यात्रेच्या ठिकाणी लोकांचे प्रबोधन करीत असत.हाच वारसा पुढे चालवत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गेली तीन दशके कुंभली यात्रेत जनजागृती करीत आहेत.देवा-धर्माला विरोध न करता देवा धर्माचे नावावर अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांना विरोध करते.अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या लोकांना संताचे विचार सांगितले जातात . वैज्ञानिक प्रयोग दाखवत तथाकथित चमत्काराचा भांडाफोड केला जातो.
कुंभली यात्रेत सर्वप्रथम १९९५ साली अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तत्कालीन भंडारा जिल्हा संघटक प्रा. आलोक केवट यांचे नेतृत्वाखाली प्रबोधनपर्व सुरू झाले. त्यानंतर सन 1998 पासून आजपर्यंत जिल्हा संघटक डी. जी. रंगारी ही प्रबोधनाची धुरा सांभाळत आहेत.
सन 2000 ते 2005 दरम्यान काही समाजकंटकांनी प्रबोधन कार्यक्रमाला विरोध करण्याचा प्रयत्न केला.काही अंधभक्तांनी एक समिती गठीत करुन त्रास देणे सुरू केले.प्रबोधन मंडप जाळण्याचा धमक्या दिल्या. परंतु अंनिस चे कार्यकर्ते डगमगले नाही.ते अविरतपणे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न करित राहिले.
आज तिस वर्षांनंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. अलौकिक शक्तीचा दावा करणाऱ्यांचे प्रमाण घटले. चमत्कारी बाबा संपले. यात समाजाचे योगदान मोठे आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले. ते दुर्गाबाई डोहाच्या यात्रेत आयोजित प्रबोधन कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी अभाअंनिस चे राष्ट्रीय महासचिव हरिश देशमुख, नागपूर जिल्हा अध्यक्ष सुनील वंजारी, नागपूर जिल्हा संघटक सुधिर आंडे, गोंदिया जिल्हा संघटक डॉ.प्रकाश धोटे, भंडारा जिल्हा अध्यक्ष मदन बांडेबुचे, राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ येवले,जिल्हा सचिव मुलचंद कुकडे, कार्याध्यक्ष प्रा.अशोक गायधने ,महिला संघटिका प्रिया शहारे, युवा संघटक अनिल किरणापूरे, तनुजा नागदेवे, भीमराव मोटघरे, शीतल नागदेवे, पत्रकार आशिष शेडगे,उपस्थित होते. पोलिस उपविभागीय अधिकारी आनंद चव्हाण यांनी प्रबोधन शिबिराचे उद्घाटन केले.याप्रसंगी अभाअंनिस चे 30 वर्षापासून सक्रीय कार्ये करणा-या जिल्हा संघटक डी जी रंगारी, यशवंत उपरीकर ,कागदराव रंगारी, बी एल मेश्राम या कार्यकर्त्यांचा मेडल देऊन सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी.जी.रंगारी,के.एस.रंगारी ,भाऊदास मेश्राम, यशवंत उपरीकर, अनिल किरणापुरे, कल्पना सागोडे,आशा वासनिक यांनी परिश्रम घेतले.