आशाताई बच्छाव
देगलूरमध्ये दीड लाखाचा गुटखा जप्त
नांदेडच्या गुटखा माफीयासह दोन जणांविरुद्ध गुन्हा.
देगलूर/प्रतिनिधी गजानन शिंदे-देगलूर शहरातील भवानी चौक परिसरात असलेल्या एका व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर गुरुवारी दुपारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तसेच पोलीसांनी छापा मारुन दीड लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी देगलूरच्या व्यापाऱ्यासह नांदेडच्या गुटखा माफियाविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देगलूर तालुका व परिसरात मोठ्या प्रमाणात शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची सर्रासपणे विक्री केली जात आहे. देगलूर शहरातील भवानी
चौक परिसरात संतोष मारोती मामीडवार (वय ४०), रा. देशपांडे गल्ली, देगलूर यांचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. गुरुवारी दुपारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे व पोलीसांनी गोडाऊनवर छापा टाकला. गोडाऊनमध्ये शासनाने बंदी घातलेल्या विविध कंपनीचा १ लाख ५२ हजार रुपये किंमतीच्या गुटख्याचा साठा आढळून आला.
व्यापारी संतोष मामीडवार यांनाहा गुटखा नांदेड येथील गुटखा माफिया अलीम सौदागर फ्रेंडसवाले रा.जुना मोंढा, नांदेड यांनी पुरवठा केला होता. याप्रकरणी अन्न व औषध विभागाचे सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन व्यापारी संतोष मामीडवार व अलीम सौदागर यांच्या विरुध्द देगलूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.