
आशाताई बच्छाव
चाळीसगावात हातगाडी चालकांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश…
रस्त्यावर कचरा टाकल्यास कारवाई;शहर पथविक्रेता समितीची बैठक….
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- येथील नगरपरिषद कार्यालयात शहर पथविक्रेता समितीची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत पथविक्रेत्यांनी व्यवसाय करतांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. रस्त्यावर वा नदीत कचरा टाकणार्यांकडून दंड वसूल केला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मुख्यधिकारी तथा शहर पथविक्रेता समिती अध्यक्ष सौरभ जोशी होते.
या बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी जोशी यांनी सांगितले की, सन 2014 च्या केंद्र शासनच्या अधिनियमानुसार सदर समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.पथविक्रेता हे शहरातील नागरिकांसाठी विविध सेवा पुरविणारे सेवा पुरवठादार आहेत. त्यानुसार पथविक्रेते यांचेकडे शहरातील नागरिकांना सेवा पुरवठा करणारे सेवा पुरवठादार म्हणून पाहावे.
त्याच वेळी रहदारी तसेच सार्वजनिक भागांची स्वच्छता व शांतता यास बाधा न येता पथविक्रेते यांना उदरनिर्वाह करू देणे या बाबींचा समन्वय साधणे हे या समितीचे कार्य असल्याचे सांगितले.
बैठकीत शहरातील पथविक्रेत्यांना त्यांनी त्यांच्याजवळ निर्माण होणारा कचरा संकलनासाठी डब्बा ठेवावा व आपल्या कडे येणार्या ग्राहकास प्लास्टिक पिशवी न देता कापडी पिशवीचाच आग्रह धरून शहर सौंदर्यास हातभार लावावा.
जे पथविक्रेते आपल्या जवळ कचरा संकलनासाठी डब्बा ठेवणार नाहीत व कचरा रस्त्यावर व नदीत टाकतील त्यांच्यावर दंडवसुलीची कार्यवाही करण्याबाबतचा ठराव करण्यात आला.
यावेळी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी शहरातील पथविक्रेत्यांनी आपल्या जवळील हातगाड्यामुळे शहरातील रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
तसेच जे पथविक्रेते आपला माल विक्रीसाठी स्पिकरचा वापर करतात त्यांनी त्या स्पीकरचा आवाज मोठा व कर्कश न ठेवता मर्यादित ठेवून त्याचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
बैठकीस मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्यासह शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक प्रदीप एकशिंगे, समिती सदस्या काजल चिरागोद्दीन खाटिक, पूनम संजय पवार, सदस्य रमेश दशरथ चौधरी, दिलीप शेकलाल जाधव, सुरेश संजय गवळी,मनोहर नामदेव सोनवणे, कचरू रामभाऊ सोनवणे व दि.अं.यो. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील शहर अभियान व्यवस्थापक किरण कुमार निकुंभ, सोनाली मोगलाईकर व समुदाय संघटक शीतल पाटील उपस्थित होते.