आशाताई बच्छाव
हिंगोली (श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ) : स्वस्तधान्य दुकानादाराकडून तांदूळ खरेदी करून तो काळ्या बाजारात वाहनातून नेताना पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने जप्त केला. यामध्ये ८ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बोलेरो पीकअप वाहन क्रमांक एम.एच.३७-टी.२७१३ यामधून स्वस्तधान्य दुकानाचा तांदूळ हा काळ्या बाजारात विक्री करण्याकरीता १८ डिसेंबरला नेण्यात येत होता. हिंगोली-वाशिम रस्त्यावर कनेरगाव नाका जवळ गजानन स्टील अॅण्ड फर्नीचर दुकाना समोर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने वाहन अडवून ८ लाखाचे बोलेरो पीकअप व ६२ हजार ५०० रूपयाचा २५ क्विंटल तांदूळ असा एकूण ८ लाख ६२ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक रहीम बशीर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंबाळा येथील सतिष रामदास इंगोले, कनेरगाव नाका येथील आशिषकुमार अशोककुमार सेठी या दोघांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियमनांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या (Hingoli Crime) प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे हे करीत आहेत. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक रहीम चौधरी, संग्राम बहीरवाल, धनंजय इंगळे यांनी केली आहे.