आशाताई बच्छाव
गाडगेबाबा घानेवाडी जलाशयाच्या समृद्धीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार – खा. डॉ. कल्याण काळे
जालना (प्रतिनीधी दिलीप बोंडे) राष्ट्रसंत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयाच्या समृद्धीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार डाॅ.कल्याण काळे यांनी दिले. घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशयाला सोमवार दि.१६ रोजी त्यांनी भेट दिली. तलावाची पहाणी करून या तलावाच्या विकासासह विविध समस्या समजून घेतल्या. यावेळी शिरपूर पॅटर्नचे जनक जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर, घाणेवाडी जलसंरक्षण मंचाचे अध्यक्ष भाईश्री रमेशभाई पटेल, जयप्रकाश चव्हाण, उद्योजक सुनील रायठठ्ठा, उदय शिंदे,ओमप्रकाश चितळकर उपस्थित होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून जालना शहरासह परिसरातील बावीस गावे आणि शेतीला पाणी पुरवणारा तलाव ही आपली ऐतिहासिक धरोहर आहे. आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची ही निषाणी आहे.याचे शास्त्रशुद्ध पध्दतीनुसार जतन आणि संवर्धन करण्याचे काम लोकसहभागातून घाणेवाडी जलसंवर्धन मंचाच्या नेतृत्वाखाली चालते. हा आदर्श संपूर्ण राज्यभरात घेण्याची गरज असल्याचे खा.डाॅ.काळे यावेळी बोलतांना म्हणाले. घाणेवाडी तलावाचे दोन्ही सांडवे तात्काळ दुरूस्त करून तलावाच्या भिंतीवरील पिचींग दुरूस्त करण्याची गरज असल्याचे भाईश्री रमेशभाई पटेल यांनी सांगितले. लोकसहभागातून यंदाच्या वर्षांत पाच लाख ट्रॅक्टर गाळ काढून परिसरातील शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहीती उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी यावेळेस दिली घाणेवाडीतील गाळ काढून कुंडलिका नदीपात्रात मोठ्या विहिरीतून पाणी उपलब्ध झाल्यास जायकवाडी धरणातून अतिशय अल्प प्रमाणात पाणी घेण्याची जालना शहराला गरज असेल असे जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांनी सांगितले.