
आशाताई बच्छाव
सर्व आंबेडकरी गटांची मोट बांधून एकत्रीकरणाची धुरा एड. प्रकाश आंबेडकरांनी सांभाळावी–माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)नागपूर येथे पत्रकार परिषदेत रिपाईच्या एकत्रिकरण विषयी बाळासाहेब आंबेडकरांना पत्रकारांनी विचारले की, सध्या मुंबई येथे रिपब्लिकन पक्षाचे एकत्रिकरण संबंधी बैठक झाली. त्यात तुम्हालाही बोलावले होते. तुम्ही नकारही दिला नाही आणि होकारही दिला नाही. त्यावर बाळासाहेबांनी सांगितले की, मी जातीय राजकारण करीत नाही. पुढे पत्रकारांनी विचारले की, एकीकरणाचे तुम्ही नेतृत्व करावे, सर्व गटांचे आंबेडकरी नेते तुम्हाला नेता मानायला तयार आहेत. त्यावर बाळासाहेबांनी उत्तर दिले की , मी नातू आहे. त्यामुळे मी नेताच आहे. मला नेता असल्याचे दुसऱ्याकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही.
बाळासाहेब आंबेडकर अगदी सत्य बोलले. ते नातू असल्याने आंबेडकरी समाजाचे नेतेच आहेत. म्हणूनच आंबेडकरी चळवडीतील जे गटातटात विखुरले आहेत त्या सर्वांना एकत्र आणून आंबेडकरी चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी सुद्धा नेते म्हणून बाळासाहेबांचीच आहे.
जातीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन वंचितांची लढाई लढणे ही अभिमानाची बाब आहे. मात्र स्वतःच्या घराला जे 17 भोके लागली आहेत, त्यांनाच आपण बुजवणार नसाल तर, दुसरे कसे काय साथ देणार आहेत? असे करून आपण समाजालाही न्याय देऊ शकणार नाही व दुसऱ्यालाही न्याय देणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःचे घर मजबूत करणार नाही तोपर्यंत दुसरे तुम्हाला नेताही मानणार नाहीत. आंबेडकरी समाज एक झाला तर इतर आदिवासी, ओबीसी स्वतःहून तुमचे नेतृत्व स्वीकारेल. आणि सर्वांचे नेतृत्व करण्याची ताकद तुमच्यात आहे यात तीळ मात्र शंका नाही.
आज संविधान बदलण्याची भाषा दररोज केली जाते. सुप्रीम कोर्टाने आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचे नुकतेच घटनाबाह्य निर्णय दिला आहे. खाजगीकरणाच्या नावाने आरक्षण संपविल्या गेले आहे. दररोज मागासवर्गीयावर अन्याय अत्याचार होतच आहेत. मागासवर्गीयांना दिल्या जाणाऱ्या सवलती दिवसेंदिवस कमी होत आहेत. सामाजिक न्याय विभागाची निधी दुसरीकडे वळती केल्या जात आहे. आणि ह्या सर्व बाबींना आंबेडकरी नेतेच कारणीभूत आहेत. कारण आपली सर्व ताकत गटातटात विखुरली आहे. राजकीय वजन आमच्या शून्यवत झाला आहे. लोकसभा, विधानसभा जाऊ द्या साधा पंचायत समिती सदस्य सुद्धा निवडून आणण्याची ताकद कोणत्याच आंबेडकरी गटात नाही ही वस्तुस्थिती आहे. आंबेडकरी नेतृत्वाच्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून आंबेडकरी जनता ही पर्याय म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाण्याचा प्रमाण वाढत आहे. आणि हे आंबेडकरी चळवळीसाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कडे वळत आहेत अशा लोकांना दलाल म्हणून हिणवण्यापेक्षा, गटातटांचे राजकारण बाजूला सारून एकच एकीकृत रिपब्लिकन पक्ष स्थापन झाले तर कोणीच आंबेडकरी चळवळ सोडून दुसरीकडे जाणार नाही, ही बाब सर्व आंबेडकरी गटांच्या नेत्यांनी समजणे गरजेचे आहे. आणि आंबेडकरी नेता म्हणून एडवोकेट प्रकाश आंबेडकरांनी प्रामुख्याने समजून घ्यावे. आणि जे आंबेडकरी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी दुकानदारी सुरू केली आहे, अशा सर्वांना एकत्रित आणून एकच सशक्त आंबेडकरवादी पक्ष स्थापन करणे ही काळाची गरज आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1924 मध्ये एका सभेत म्हणाले होते की, तुम्हाला सत्तेत जायला अजून किमान शंभर वर्षे लागतील. 2024 ला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. आता तरी सर्व गटातटांचे राजकारण बाजूला सारून 2024 ला सर्व गटातटाना एकत्रित करून, सत्तेची चाबी हाती घेण्याची जबाबदारी बाळासाहेब आंबेडकरांनी घ्यावी. व समाजाला न्याय मिळवून द्यावे. आंबेडकरी समाज मोठ्या आशेने एकत्रित करण्याची वाट पाहत असल्याचे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे जिल्हा परिषद भंडारा यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.