आशाताई बच्छाव
४६ ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र कार्यालय बांधकामासाठी निधी मंजूर
९.९० कोटींचा निधी मिळणार : जि.प. अध्यक्षांचा पाठपुरावा फळाला
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ): जिल्ह्यातील ४६ ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र कार्यालय इमारतीसाठी शासनाकडून ९ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निमित्ताने जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी शासनस्तरावर केलेला पाठपुरावा यशस्वी झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र इमारतींचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये वारंवार उपस्थित करण्यात आला होता. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी स्वतंत्र इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पंचायत विभागाला दिले होते. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत या ग्रामपंचायतींच्या कार्यालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, याबाबत चंद्रकांत ठाकरे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चाही केली. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालय नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात महत्वाचे दस्तावेज जपून ठेवणे कर्मचाऱ्यांना अवघड जाते, पाणी गळती झाल्यास दस्तावेज भिजण्याची भीतीही असते. स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचे महत्व जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी संबंधित यंत्रणेसह ग्रामविकास मंत्र्यांना पटवून दिले. अखेर ग्रामविकास विभागाने या प्रस्तावाला हिरवी झेंडी दिली असून, बांधकामासाठी निधीदेखील मंजूर केला. ९ कोटी ९० लाखांच्या निधीतून ४६ ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम करावे लागणार आहे. कारंजा तालुक्यात सर्वाधिक २२ ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असून, त्याखालोखाल मंगरूळपीर तालुक्यात ८, वाशिम ७, मानोरा ६ व मालेगाव तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र कार्यालय इमारत असावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविले होते. वेळोवेळी पाठपुरावा केला. ग्रामविकास विभागाकडून ४६ ग्रामपंचायतींसाठी ९.९० कोटींचा निधी मंजूर झाल्याने पुढील कार्यालय लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या.
चंद्रकांत ठाकरे
अध्यक्ष, जिल्हा परिषद वाशिम