आशाताई बच्छाव
सुप्रिम कोर्टाचा संविधानविरोधी निर्णय त्वरीत रद्द करा – प्रकाश आठवले
बहूजन समाज पार्टीचे निषेध आंदोलन : राष्ट्रपतींना निवेदन
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- अनुसुचित जाती जमातीचे वर्गीकरण व त्यांना क्रिमिलेअर लावण्यासंदर्भात सुप्रिम कोर्टाने दिलेला निर्णय हा संविधानविरोधी असून हा निर्णय त्वरीत रद्द करण्याच्या मागणीसाठी २१ ऑगष्ट रोजी भारत बंद दरम्यान बहूजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हा प्रभारी अविनाश वानखेडे, जिल्हाध्यक्ष प्रकाश आठवले यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध आंदोलन राबवून कोर्टाच्या या निर्णयाचा विरोध करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. तसेच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून हा निर्णय रद्द करण्यासह आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकण्याच्या मागणीसह इतरही अनेेक मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या. यावेळी शहरात भारत बंद दरम्यान कार्यकर्त्यांनी उस्फूर्तपणे दुकाने बंद करावयास लावली.
निवेदनात नमूद आहे की, देशाच्या सुप्रीम कोर्टातील सात जजेसच्या बेंचने १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जाती- जमातीचे वर्गीकरण करून त्यांना क्रिमिलियर लावणे संदर्भात निर्णय दिला. हा निर्णय भारतीय संविधानाच्या विरोधात असून असंवैधानिक आहे. त्यामुळे आपण विनाविलंब संसदेचे विशेष सत्र बोलावून हा निर्णय रद्द करावा, तसेच आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकावे. जेणेकरून यापुढे अनुसूचित जाती-जमातीच्या संविधानिक आरक्षणाशी कोणी छेडछाड करणार नाही. बहुजन समाज पार्टी ही देशातील तिसर्या क्रमांकाची राष्ट्रीय पार्टी असून या पक्षाचा भारतीय संविधानावर प्रगाढ विश्वास आहे. त्यामुळेच बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी यांनी सुप्रीम कोर्टाने १ ऑगस्ट २०२४ रोजी जातीयवादी दृष्टिकोन पुढे ठेवून एससी, एसटीमध्ये वर्गीकरण व क्रिमीलेअर लागू करण्या संदर्भात दिलेल्या असंवैधानिक निर्णयाचा सर्वप्रथम सार्वजनिक रित्या विरोध केला. हा संविधानविरोधी निर्णय संसदेने रद्द करावा व आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकण्याची मागणी पक्षाच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली.
बहूजन समाज पार्टीच्या वतीने ३६ जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तथा राज्यसभा खासदार इंजि. रामजी गौतम, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड. सुनील डोंगरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रभारी अविनाश वानखेडे, जिल्हाध्यक्ष प्रकाश आठवले, सोशल मिडीयाप्रमुख नागेश अवचार, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भगत, जिल्हा महासचिव नथ्थु लबडे, जिल्हा कोषाध्यक्ष भारत सावळे, जिल्हा सचिव मोहन खिराडे, जिल्हा संयोजक रुपेश वानखेडे, उत्तम वानखेडे, मंगेश ताजणे, विश्वजीत वानखेडे, धनराज गायकवाड, कैलास वानखेडे, कबीर वानखेडे, मंगेश इंगळे, सौरभ भगत, शाम सरकटे, कुणाल ताजणे, प्रविण इंगोले, नितेश डोेंगरे, प्रशांत आठवले, ओंकार जावळे आदींसह शेकडोंच्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरीक पक्षाचा निळे झेंडे घेवून सहभागी झाले होते.