आशाताई बच्छाव
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : लाभ वितरणाचा दुसरा टप्पा 31 ऑगस्टला
रकम थेट जमा होण्यासाठी आधार सिडींग प्राधाण्याने करा – जिल्हाधिकारी संजय दैने
बँकांनी योजनेच्या रकमेतून कपात करू नये
गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)दि. २० : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ३१ जुलै पर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार १७ ऑगस्ट रोजी लाभ वितरण करण्यात आले आहे. ई-केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा 31 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रीया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख 17 हजार 388 अर्ज प्राप्त झाले असून एक लाख 54 हजार 632 अर्ज मंजूर करून लाभ वितरणासाठी शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. तसेच नव्याने प्राप्त अर्जही शासनाकडे लवकरच पाठविण्यत येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील एक लाख 33 हजार महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये लाभ वितरीत करण्यात आला आहे. इ-केवायसी पूर्ण नसल्याने ज्या महिलांच्या खात्यात रक्कम अद्यापपर्यंत जमा झाली नाही त्या लाभार्थी महिलांनी इ-केवायसी पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. तरी इ-केवायसी प्रलंबित असलेल्या महिलांना शासनातर्फे मोबईल संदेश पाठविण्यात आला आहे, त्यांनी तातडीने आपले खाते आधार सिडिंग करून ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
बँकांनी रकम कपात करू नये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान तात्काळ जमा होण्यासाठी सर्व बँकांनी त्यांच्याकडील लाभार्थ्यांचे खात्याची आधार सिडिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच जमा होणाऱ्या अनुदानातून कुठल्याही प्रकारचे हप्ते थकीत रक्कम किंवा किमान शिल्लक च्या नावाखाली कुठलाही प्रकारची रक्कम कपात न करता जमा झालेले संपूर्ण अनुदान लाभार्थ्यांना अदा करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी बँकांना दिले आहे. याबाबत कुठलीही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित बँकेवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी दैने यांनी बँकांना दिलेला आहे