Home चंद्रपूर ओबीसींच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

ओबीसींच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

23
0

आशाताई बच्छाव

1000655507.jpg

ओबीसींच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

ओबीसी मुला-मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन

चंद्रपूर,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ) दि.१८ – आज ओबीसींसाठी वसतीगृह स्थापन होत आहेत. पण पूर्वी ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माझी चर्चा झाली. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय असायला हवे, यावर शिक्कामोर्तब झाले. फाईल स्वाक्षरीसाठी माझ्याकडे आली तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता स्वाक्षरी केली. आणि ९ मार्च २०१७ ला महाराष्ट्रात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाले. ओबीसींच्या कल्याणासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

ओबीसीं मुला-मुलींच्या वसतीगृहांचे उद्घाटन ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दीड ते दोन वर्षांत अतिशय सुंदर ओबीसी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे वसतीगृह तयार होतील. नाशिकच्या धरतीवर डिझाईन तयार केले आहे, अशी माहितीही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे अॅड. पुरुषोत्तम सातपुते, भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे, सहायक आयुक्त श्रीमती कवाडे, अरुण तिखे, विलास माथनकर,प्रा. अनिल डहाके, गोमती पाचभाई, डॉ. मंगेश गुलवाडे, रमेश राजूरकर, संदीप आवारी, पुरुषोत्तम सहारे, सुर्यकांत खनके, उमेश कोराम, सुभाष कासमगोट्टुवार, अजय सरकार, सविता कांबळे, श्रुती गवारे, शिला चव्हाण, शितल गुरनुले, वनिता डुकरे यांची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणणे, अफजलखानाच्या कबरीचे अतीक्रमण हटवणे किंवा भवानी मातेसाठी रत्नजडीत छत्र उभे करणे असेल, मला ही कामे करता आली, हे माझं भाग्य आहे. रायगडावर आता दरवर्षी राज्य सरकारच्याच वतीने राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादचे नाव बदलण्याची इच्छा वारंवार मांडली होती. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी ही मागणी मान्य करून छत्रपती संभाजीनगर असे नाव केले. त्यात माझाही खारीचा वाटा आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२० मध्ये लंडन येथे ज्या घरी शिक्षणासाठी मुक्कामाला होते, त्या घराला स्मारक करण्याची संकल्पना पुढे आली. त्या फाईलवर स्वाक्षरी करण्याचे भाग्य देवेंद्रजींसोबत मलाही लाभले, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपूरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात असा प्रयत्न आहे. मी १६ मार्च १९९५ मध्ये आमदार झाल्याबरोबर पहिली घोषणा वाचनालयाची केली होती. आज चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा येथील दिड हजार विद्यार्थी वाचनालयाचा लाभ घेत आहेत. मुंबईत एखादा पीएसआय किंवा विभागाचा अधिकारी भेटतो. तो अभिमानाने सांगतो की आपण सुरू केलेल्या वाचनालयात अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण झालो आणि इथेपर्यंत पोहोचू शकलो. माझेही मन आनंदाने भरून येते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

स्व. बाबा आमटे यांच्या सेवाकार्याची दखल म्हणून शासनातर्फे डाक तिकीट प्रकाशित केले. पण त्यांच्या स्मृती जपण्यासाठी उत्तम अभ्यासिका आवश्यक आहे असे मला वाटले. आज स्व. बाबा आमटे अभ्यासिका अनेक विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरत आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राचा आयपीएस-आयएएसचा टक्का वाढला पाहिजे, असे मला सातत्याने वाटायचे. मी याकडे सभागृहात लक्ष वेधले. त्यानंतर ठराव झाला आणि समिती तयार झाली. आता महाराष्ट्राचा टक्का वाढला. ट्रेनिंग सेंटर अत्याधुनिक झाले. अधिकाऱ्यांची संख्या वाढवली, हे सांगतानाच ना. श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात ३०० ओबीसी विद्यार्थ्यांना आणि ३०० ओबीसी विद्यार्थिनींना आधार योजना देण्याचा निर्णय केल्याची माहितीही दिली.

त्यांना तुरुंगात टाकू
व्यावसायिक शिक्षण घ्यायचे असेल तर ५० टक्के शुल्क सवलत होती. आता ओबीसी मुलींना १०० टक्के शुल्क सवलत केली. इडब्ल्यूएसमध्ये देखील १०० टक्के सवलत केली आहे. काही व्यवस्थापनांनी यात खोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अशा संस्थांच्या प्रमुखांना तुरुंगात टाकले पाहिजे. कारण ते राज्याच्या योजना बदनाम करत आहेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

आर्थिक स्थिती बळकट

बहिणींना विश्वासाने सांगितले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. राज्याच्या तिजोरीवर या योजनेचा मुळीच भार नाही. मी अर्थमंत्री असताना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा राज्याचा महसूल ११ हजार ९७५ कोटी रुपयांनी सरप्लस केला होता. आपली आर्थिक स्थिती बळकट आहे. आपण शेवटच्या व्यक्तीच्या प्रगतीसाठी काम करण्याचा उद्देश पुढे ठेवला आहे. कुणीही वंचित राहू नये असा आपला प्रयत्न आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपूरच्या शैक्षणिक प्रगतीसाठी…
चंद्रपूर जिल्हा शिक्षण क्षेत्रात वेगाने पुढे जावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून त्यादृष्टीने पाऊल टाकले आहे. चंद्रपूर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये श्री.रतन टाटांकडून २६३ कोटी रुपये आणले आहेत. अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत अशी व्यवस्था असेल. एसएनडीटी विद्यापीठ परिसर तयार होत आहे. यात सर्व जातींच्या हजारो मुलींसाठी ६२ अभ्यासक्रम आणले आहेत. चंद्रपूरमधील मुलं देखील व्यावसायिक पायलटचं प्रशिक्षण घेऊ शकतील. मोरवा एअरपोर्टमध्ये फ्लाईंग क्लब लवकरच सुरू होणार आहे. ओबीसी, आदिवासी मुलामुलींना त्याचा लाभ मिळणार आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

श्रुती गवारे विध्यार्थिंनीने मानले आभार
श्रुती गव्हारे विध्यार्थिंनीने आपलें मनोगत व्यक्त करीत एक सुंदर कविता सादर केली. ओबीसी मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरु केल्याबद्दल ना. मुनगंटीवार यांचे कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानले

Previous articleबाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नका
Next articleसर्व समाजासाठी झटणारा नेता आमदार डॉ.देवरावजी होळी:- इंजि.प्रमोदजी पिपरे यांचे प्रतिपादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here