आशाताई बच्छाव
नाशकात सिटीलिंक बसखाली चिरडून पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
नाशिक : प्रतिनिधी सतीश सावंत
नाशिक : नाशिक महानगर पालिकेच्या सिटीलिंक बससेवा आता पुन्हा वादात सापडली असून, नशिक शहरातील नाशिकरोड परिसरात सिटीलिंक बसच्या धडकेत एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीही सिटीलिंक बस अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. या अपघातात पाच वर्षीय चिमुकलीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, हा ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं..?
अधिक माहितीनुसार, आज बुधवार (दि. 10) जुलै रोजी दुपारी दीड वाजता नशिकरोड भागातील गाडेकर मळा परिसरात बस डेपो आवारात हा अपघात घडला. या अपघातात सानवी सागर गवई (वय 5 वर्ष, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, नाशिकरोड) या चिमुरडीचा मृत्यु झाला आहे. मृत चिमुकली ही इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत असून, शाळेतून ती तिच्या आजोबांसोबत आजी जिजाबाई गवई यांच्या बस डेपो आवरातील चहाच्या टपरीवर जात असताना सिटीलींक बस चालकाने भरधाव वेगाने तिला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात डोक्यावरून चाक गेल्याने चिमूरडीचा जागीच मृत्यू झाला असून, तिचे आजोबादेखील जखमी आहेत.
बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय
या अपघातातील बस चालक हा दारु पिऊन बस चालवत असल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात येत आहे. संतप्त जमावाकडून बसची तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, नाशिकरोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेची पुढील तपास नाशिकरोड पोलिस करत आहे. या घटनेमुळे शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.