आशाताई बच्छाव
नाशिक हादरलं..! जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच वृद्धाला जिवंत जाळले
प्रतिनिधी : नाशिक. सतीश सावंत
नाशिकः गेल्या काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये मित्रांनीच किरकोळ वादातून घरात घुसून मित्राची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून आणखी एक हादरवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सख्ख्या भावानेच जमिनीच्या वडतून वृद्ध भावाला संपवले.
शेत जमिनीच्या वादातून या वृद्ध भावाला डिझेल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेमुळे जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात जमिनीच्या मालकीचा वाद विकोपाला गेल्याने भाऊ आणि भावाच्या कुटुंबीयांनीच वृद्धाला जाळले असून, उपचारादरम्यान कचेश्वर नागरे (वय 80) यांचा मृत्यू झाला आहे.
नेमकं प्रकरण काय..?
अधिक माहितीनुसार, निफाड तालुक्यातील थडी सारोळे गावातील हा प्रकार असून, मृत कचेश्वर नागरे (वय 80) हे आणि शेजारीच राहणारा त्यांचा लहान भाऊ चांगदेव नागरे यांच्यात शेतातील वडिलोपार्जित विहिरीवरुन गेल्या सात- आठ वर्षांपासून वाद सुरु होते. दरम्यान, मृत कचेश्वर नागरे हे मंगळवारी त्यांच्या शेतातील घराजवळ साफसफाई करत असताना त्यांचा भाऊ चांगदेव नागरे, भावजई आणि पुतण्यांनी त्यांच्यावर डिझेलसदृश्य पदार्थ ओतून पेटवले आणि तिथून पसार झाले.
यानंतर कचेश्वर नागरे हे जीव वाचण्यासाठी सैरभैर पळायला लागल्याने त्यांचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंबीय धावत बाहेर आले. ते जवळपास 95 टक्के भाजलेले असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका मृत नागरे यांच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.
त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, चांगदेव महादू नागरे आणि कचेश्वर महादू नागरे यांच्यात गेल्या सात-आठ वर्षांपासून थडी सरोळे गावात नांदूर मध्यमेश्वर येथील शेत जमीनीवरून वाद सुरु होता. माझे वडील कचेश्वर महादू नागरे आणि आई जिजाबाई नागरे हे वयोवृद्ध असून ते येथे एकटेच राहत होते. माझा भाऊ शेजारी राहतो. पण तो कामासाठी बाहेर गेला असल्याने याचाच फायदा घेत वडिलांवर डिझेल ओतून पेटवले आणि तेथून पळ काढल्याचे मृत नागरे यांचा मुलगा संजय नागरे यांनी सांगितले.