Home वाशिम नंदीपेठ भागातील उखडलेल्या रस्त्यामुळे वृध्द महिला व पुरुषांना गंभीर इजा

नंदीपेठ भागातील उखडलेल्या रस्त्यामुळे वृध्द महिला व पुरुषांना गंभीर इजा

50
0

आशाताई बच्छाव

1000522280.jpg

नंदीपेठ भागातील उखडलेल्या रस्त्यामुळे वृध्द महिला व पुरुषांना गंभीर इजा
संतप्त नागरीकांनी सा.बां. विभागाच्या खुर्चीला घातला हार
वाशिम,( गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये असलेल्या नंदीपेठ भागातील तोंडगाव मस्जीदच्या मागील रस्ता गेल्या एक वर्षापासून खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करतांना वृध्द महिला व पुरुषांचे अपघात होवून त्यांना गंभीर शारीरीक दुखापतींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर रस्ता केवळ खोदून ठेवून नागरीकांच्या अपघातात कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर कठोर कारवाई आणि दुखापतग्रस्त नागरीकांना नुकसान भरपाईच्या मागणीसाठी श्री बागेश्वर धाम महाराष्ट्र सेवा समितीचे जिल्हा सरचिटणीस चेतन इंगोले यांच्या नेतृत्वात ५ जुलै रोजी नागरीकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. मात्र तेथे कार्यकारी अभियंता गैरहजर असल्यामुळे संतप्त नागरीकांनी रितसर निवेदन देवून कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून आपला संताप व्यक्त केला.
यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, नंदीपेठ प्रभाग क्र. १२ मधील तोंडगाव मज्जीदच्या मागील रस्ता एक वर्षापासून खोदुन ठेवला आहे. अद्यापर्यत हा रस्ता बनविण्यात आला नाही. या रस्त्यावर संडासचे पाईप व भुयारी गटार योजनेचे चेंबर उघड्या अवस्थेत आहेत. रस्त्याच्या अशा दुरावस्थेमुळे या रस्त्यावरुन ये-जा करणार्‍या नागरीकांना गंभीर शारीरीक दुखापतींचा सामना करावा लागत आहे. संडासचे पाईप व उघड्या चेंबरमुळे अनेक वृध्द महिला व पुरुष जखमी झाले असून काहीजण कायमचे जायबंदी झाले आहेत. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या रस्त्याच्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र सा.बां. विभागाने या रस्त्याचे काम दिलेल्या ठेकेदाराकडून अद्यापही हा रस्ता बनविण्यात न आल्यामुळे नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी सदर रस्त्याचे काम रखडण्यास जबाबदार असलेेले अधिकारी व ठेकेदारावर कठोर कारवाईसह दुखापतग्रस्त नागरीकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. अन्यथा प्रभाग क्रमांक १२ मधील सर्व नागरीकांसह सा.बां. विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा बागेश्वरधाम सेवा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते चेतन इंगोले, विजय लाडुकर, आदित्य काळे, चेतन इंगळे, विकी शेजुळकर, अभिषेक चोपडे, मनोज सावके, आदित्य मिटकरी, बाळू जावळे, प्रताप नागरे, भूषण बाराहाते, समाधान विभुते, मयूर शिंदे यांच्यासह प्रभागातील महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व नगर परिषद प्रशासनाला देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here