Home गडचिरोली वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनच्या कामाची खासदार अशोक नेते यांच्याकडून पाहणी…

वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनच्या कामाची खासदार अशोक नेते यांच्याकडून पाहणी…

48
0

आशाताई बच्छाव

1000410896.jpg

वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनच्या कामाची खासदार अशोक नेते यांच्याकडून पाहणी…

महत्वाकांक्षी प्रकल्पातील अडचणी दूर करणार….

 

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ): गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेमार्गाचे जाळे विस्तारण्यासाठी पुढाकार घेणारे खासदार अशोक नेते यांनी वडसा-गडचिरोली या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाच्या कामांना भेट देऊन या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी सदर कामात असलेल्या काही अडचणी दूर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच हे काम जोमाने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचे खरे मानकरी असणाऱ्या खा.नेते यांनी शनिवारी वडसा, कोंढाळा, आरमोरी येथील रेल्वेमार्गाच्या कामांना भेटी देऊन रेल्वेमार्गाच्या उभारणीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह रेल्वेचे अभियंता होते. वडसा-गडचिरोली या रेल्वेमार्गाचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम खा.नेते यांच्या सततच्या पाठपुराव्याने मार्गी लागून या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली. शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी रेल्वेमार्गाचा विस्तार गडचिरोली जिल्ह्यात इतरही भागात करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, रेल्वे अभियंता शिवदत खंडाईत, सेक्शन अभियंता आर.पी. सिंग, सेक्शन अभियंता नरेंद्र कुमार, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पारधी, जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, महामंत्री वसंत दोनाडकर, जेष्ठ नेते माणिक कोहळे, प्रमोद झिलपे, प्रकाश निकुरे, निलेश बोमनवार, योगेश नाकतोडे, तसेच मोठया संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

रेल्वेमार्गात 40 पुलांची होणार उभारणी

वडसा रेल्वे स्टेशन ते गडचिरोली रेल्वे स्टेशन हा 52 किलोमीटरचा रेल्वेमार्ग इतर रेल्वेमार्गांच्या तुलनेत उंच राहणार आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या भ्रमंतीसाठी या मार्गात 40 पुलांची उभारणी केली जाणार आहे. त्या पुलाखालून वन्यप्राणी सहजपणे इकडून तिकडे जाऊ शकतील. या पूलांची उभारणी आणि रेल्वेमार्गासाठी वनविभागाच्या काही अडचणींसोबत मुख्य वीजवाहक टॅावर लाईनच्या तारा मध्ये येत असल्याने अडचण निर्माण झाली आहे. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांचे मंत्री, तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी भेटून या अडचणी निकाली काढून रेल्वे लाईनच्या कामाची गती मंदावू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी खा.नेते यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली. या रेल्वेमार्गातील विविध अडचणी पाहता हा रेल्वेमार्ग होणारच नाही, अशी टिका विरोधक कितीही करत असले तरी त्या अडचणींवर मात करून हे काम मार्गी लावण्यासाठी मी कटीबद्ध आहे, असा विश्वास खा.नेते यांनी व्यक्त केला.

नवीन रेल्वेमार्गाच्या कामांनाही येणार गती

याशिवाय आणखी दोन रेल्वेमार्ग मंजूर केले होते. त्यात नागभिड-नागपूर या ब्रॅाडगेज रेल्वेमार्गाचे काम सुरू झाले असून गडचिरोली ते धानोरा, मुरूमगाव, छत्तीसगडमधील भानुप्रतापपूर आणि नारायणपूरपर्यंतचा ब्रॅाडगेज रेल्वेमार्गही मंजूर केला आहे. या कामाचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. याशिवाय दोन ब्रॅाडगेज लाईनसाठी सर्व्हेक्षणाला मंजुरी मिळवली आहे. त्यात नागभिड, काम्पाटेम्पा, चिमूर, वरोरा आणि दुसरा गडचिरोली ते चामोर्शी, आष्टी, आलापल्ली, सिरोंचा, मंचेरियाल, अदिलाबाद या ब्रॅाडगेज रेल्वेमार्गासाठी सर्व्हेक्षण मंजूर करून आणले असल्याची माहिती खा.अशोक नेते यांनी दिली. यामुळे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात रेल्वेमार्गाचे जाळे विस्तारण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here