
आशाताई बच्छाव
सावित्रीबाई फुले स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
समाजाचा रोष पत्करून स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई यांची आज पुण्यतिथी आहे. सावित्रीबाईंबद्दल काही गोष्ट प्रत्येक भारतीयाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. या व्यतिरीक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हटलं जातं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले.
पती म्हणून ज्योतिबांचे स्थान सावित्रीबाईंच्या जीवनात आहेच, पण त्याही पलीकडे एका कार्यरत आणि द्रष्ट्या ज्योतिबांचे चित्रण सावित्रीबाईंनी केले आहे. ज्योतिबा हे त्यांचे आदर्शस्थान आहेत, मार्गदर्शक आहेत. सावित्रीबाईंनी आपल्या काव्यप्रतिभेने ज्योतिबांना पुढील शब्दांत वंदन केले आहे-
“ज्योतिबांना नमस्कार। मनोभावे करतसे
ज्ञानामृत आम्हा देई। आशा जीवन देतसे
थोर जोति दीन शूद्रा। अतिशूद्रा हाक मारी
ज्ञान ही ईर्षा देई। ती आम्हाला उद्धरी… (ज्योतिबांना नमस्कार)’
‘माझ्या जीवनात। जोतिबा स्वानंद।।
जैसा मकरंद। कळीतला… (संसाराची वाट)”
शिक्षणाशिवाय बहुजन समाजाच्या, शुद्रांच्या जीवनात बदल घडून येणार नाही, हे त्यांनाही उमगले होते. म्हणूनच पुढील शब्दांत त्यांनी अक्षरांचा श्रम केला आहे-
“शूद्रांना सांगण्याजोगा। आहे शिक्षणमार्ग हा
शिक्षणाने मनुष्यत्व। पशुत्व हाटते पहा’ (शूद्रांचे दुखणे)
‘विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन’ (श्रेष्ठ धन)
‘उठा बंधूंनो अतिशूद्रांनो, जागे होऊन उठा
परंपरेचि गुलामगिरी ही तोडणेसाठी उठा
बंधूंनो, शिकण्यासाठी उठा “त्यांच्या ‘पिवळा चाफा’, ‘जाईचे फूल’, ‘फुलपाखरू’ या कविता उल्लेखनीय आहेत. अत्यंत तरल अशा शब्दकळेतून या कविता रसिकांपुढे येतात.
“पिवळा चाफा
रंग हळदीचा
फुलला होता
हृदयी बसतो
(पिवळा चाफा)’
‘फुल जाई
पहात असता
ते मज पाही
मुरका घेऊन
(जाईचे फूल)”
शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई म्हणतात..
“विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानिती जन”
सौ अर्चनाताई जामोदे
खामगाव (बुलढाणा)